सिंधुदुर्ग : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वेंगुर्ला तालुक्यातून एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. एका ग्रामीण शाळेत सहावीमध्ये शिकणाऱ्या 11 वर्षीय मुलीशी त्याच शाळेतील एका शिक्षकाने अश्लिल चाळे केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. ही घटना गुरुवारी घडली आहे. याप्रकरणी पोलिसात गुन्हा दाखल केला असून शिक्षक जयप्रकाश तेरसे याला अटक करण्यात आली आहे.


वेंगुर्ल्यातील दोन शिक्षकी शाळेत हा प्रकार घडला आहे. गुरुवारी शाळेतील एक शिक्षक ट्रेनिंगसाठी गेले होते. याच संधीचा फायदा घेत या शिक्षकाने सायंकाळी मुलीला संगणक कक्षात बोलावून घेतले आणि तेथे तिच्यासोबत अश्लिल चाळे करण्यास सुरुवात केली. या प्रकाराने भांबावलेल्या मुलीने त्या शिक्षकाच्या तावडीतून कशीबशी सुटका करून घेत थेट घर गाठले.

घडल्या प्रकाराने घाबरलेली मुलगी शुक्रवारी सकाळी कोणत्याही परिस्थितीत शाळेत जाण्यास तयार नव्हती. अखेर तिच्या आईने तिला विश्वासात घेत चौकशी केली असता मुलीने घडलेला प्रकार आईला सांगितला. हा प्रकार ऐकताच तिच्या आईलाही धक्का बसला.

मुलीच्या आईने या प्रकाराची कल्पना मुलीच्या वडिलांना दिली. तिच्या वडिलांनी हा सर्व प्रकार पालक-शिक्षक समिती अध्यक्षांच्या कानावर घातला. संतप्त पालकांनी शुक्रवारी शाळेला धडक दिली. पण संबंधित शिक्षक शाळेत हजर नसल्याने पालकांनी पोलिसांसोबत तो राहत असलेल्या ठिकाणी जाऊन त्याला पोलिसांच्या ताब्यात दिले.

पोलिसात दाखल झालेल्या तक्रारीनुसार पोलिसांनी शिक्षक जयप्रकाश तेरसे याच्याविरोधात भा. दं. वि. कलम 354 (अ) 1-1-4, लैंगिक अत्याचारापासून बालकांचे संरक्षण अधिनियम कलम 8, 10, 12 अन्वये गुन्हा दाखल करुन घेतला आहे. या प्रकरणाचा अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक रुपाली गोरड करीत आहेत.

गृहराज्यमंत्रि दीपक केसरकराच्या मतदारसंघात अश्या घटना वाढत आहेत. काही दिवसापूर्वी सावंतवाडीतील मळगाव मध्ये अल्पवयीन मुलीवर तीन मुलांनी अत्याचार केले होते. त्यानंतर वेंगुर्ला तालुक्यातील या घटनेमुळे गृहराज्यमंत्र्यांच्या जिल्ह्यात अशा घटना वारंवार घडत असल्याने नागरिकांकडून नाराजी व्यक्त होते आहे. तसेच जिल्हावासियांकडून अशा व्यक्तींवर कडक कारवाई करण्याची मागणी केली जात आहे.