Nagpur News नागपूर: विदर्भातील हजारो शाळा आजपासून सुरू झाल्या असून विद्यार्थ्यांच्या शाळेच्या आजचा पहिला दिवस वेगवेगळ्या उपक्रमांनी स्मरणीय ठरला आहे. काही शाळांनी पहिल्या दिवशी विद्यार्थ्यांचे फुलं देऊन स्वागत केले. तर काही शाळांनी पहिल्याच दिवशी शाळेत विद्यार्थ्यांसाठी वेगळे कार्यक्रम ठेवून विद्यार्थ्यांचे स्वागत केले. मात्र, नागपूरच्या (Nagpur News) नूतन भारत शाळेनं पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांना राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्याची माहिती व्हावी यासाठी विद्यार्थ्यांना संघाच्या रेशीमबाग कार्यालयात (Rashtriya Swayamsevak Sangh Headquarters) नेले.


संघाचे आद्य सरसंघचालक डॉ. हेडगेवार आणि द्वितीय सरसंघचालक गोळवलकर गुरुजी यांच्या स्मृतिस्थळाला वंदन करत विद्यार्थ्यांनी त्यांच्या शैक्षणिक क्षेत्राची सुरुवात केली. वर्तमान काळात हिंदुत्व काय? त्यासाठी कोणी कोणता त्याग केला आहे, हे भविष्यातील पिढीला कळावं, या उद्दिष्टाने आम्ही आमच्या सर्व 500 विद्यार्थ्यांना शैक्षणिक क्षेत्राच्या पहिल्याच दिवशी संघस्थानी आणल्याचे मत शाळा व्यवस्थापनाने व्यक्त केले आहे.


पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांनी संघ मुख्यालयाची सफर 


शालेय विद्यार्थ्यांना संघस्थानी आणण्यात काहीही गैर नाही. देशातील सर्व प्रकाराचे विचार विद्यार्थ्यांना कळावे आणि त्यांनी योग्य निर्णय घ्याव, असा आमचा उद्दिष्ट असल्याचे मतही शाळा व्यवस्थापनाने बोलताना व्यक्त केले आहे. नूतन भारत शाळेचे विद्यार्थी आज संघाच्या रेशीम बाग कार्यालयात थांबून संघाचे कार्य कसे चालतं, संघ कोणकोणते काम करतात याची माहितीही घेतली. पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांनी संघ मुख्यालयाची सफर आणि एक वेगळा अनुभव मिळाल्याने विद्यार्थ्यांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले होते.


डीजेच्या ताल, सजविलेल्या बैलगाडीचा झगमगाट, विद्यार्थ्यांचं जंगी स्वागत


विदर्भातील जिल्हा परिषद आणि खाजगी शाळांना आजपासून सुरुवात झाली. शाळेच्या पहिल्या दिवशी विद्यार्थ्यांचं जोरदार स्वागत करण्याचं निर्देश शिक्षण विभागानं दिलं होतं. त्यानुसार भंडारा जिल्ह्याच्या मोहाडी पंचायत समिती अंतर्गत येणाऱ्या पारडी येथील जिल्हा परिषद शाळेत अगदी एखाद्या थाटामाटात पार पाडणाऱ्या विवाह सोहळ्याला लाजवेल, अशीच जय्यत तयारी शाळेचे मुख्याध्यापक मुबारक सय्यद यांनी ग्रामस्थांच्या मदतीनं केली होती. 


अगदी सकाळपासून ग्रामस्थ आणि शिक्षकांची लगबग इथं बघायला मिळाली. हारतुरे, फुलं आणि फुग्यांनी सजविलेल्या बैलगाडीमध्ये या शालेय विद्यार्थ्यांना बसवून गावफेरी काढण्यात आली. अगदी वाद्याच्या तालावर निघालेल्या या शालेय प्रवेशोत्सवात संपूर्ण ग्रामस्थ सहभागी झाले होते. गावात वाजत गाजत गावातून निघालेली ही फेरी शाळेत पोहोचल्यावर शाळेच्या प्रवेशद्वारावर विद्यार्थ्यांचं कुमकुम तिलक लावत मोठ्या उत्स्फूर्तपणे स्वागत करण्यात आलं. शाळेच्या पहिल्या दिवशी शाळा काय असते? आणि विद्यार्थ्यांना अभ्यासाची गोडी लागावी, यासाठी ग्रामस्थ आणि शाळेनं केलेल्या या उपक्रमाची जिल्ह्यात आता चर्चा रंगू लागली आहे.


इतर महत्वाच्या बातम्या