लातूर : शाळेच्या फीसाठी सात वर्षाच्या मुलाला तीन तास डांबून ठेवल्याची धक्कादायक घटना लातूरच्या उदगीरमध्ये समोर आली आहे. याप्रकरणी शिक्षक, संस्थाचालक यांच्यासह आणखी एकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


उदगीर येथे राहणारा सात वर्षाचा कार्तिक चंद्रशेखर स्वामी लिटील इंग्लिश स्कूल येथे शिक्षण घेत आहे. कार्तिकची 18 हजार रुपये फी थकली होती. शुक्रवारी रोजच्याप्रमाणे कार्तिक शाळेच्या गाडीतून शाळेत गेला होता. मात्र दुपारी शाळा सुटल्यानंतरही तो परत आला नाही. कार्तिक घरी न परतल्याने त्यांच्या वडिलांनी गाडी चालकाकडे विचारणा करून शोध घेत शाळा गाठली.


त्यावेळी कार्तिक शाळेतील कार्यालयात रडत बसला होता. कार्तिकच्या वडिलांनी चौकशी केल्यानंतर 18 हजार रुपये फी थकल्याने कार्तिकला थांबवून ठेवल्याचे शाळेकडून सांगण्यात आलं. भीतीपोटी दुसऱ्या दिवशी कार्तिकने शाळेत जाण्यात नकार दिला.


त्यानंतर कार्तिकच्या वडिलांनी शिक्षिका आशा ममदापूरे, संस्थापक राजकुमार ममदापूरे व सरअराज शेख या तिघांविरोधात उदगीर ग्रामिण पोलिसांत तक्रार नोंदवली आहे. तक्रारीवरुन बालन्याय अधिनियमन 2015 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस पुढील तपास करत आहेत.