अहमदनगर : बलात्काराच्या घटनेनं हादरलेल्या कोपर्डीमध्ये राज्य परिवहन महामंडळाकडून बससेवा सुरु करण्यात आली आहे. श्रीगोंदा, कुळधरण आणि कोपर्डी मार्गावरुन ही बस सुरु करण्यात आली आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांनी आनंद व्यक्त केला आहे.
अहमदनगरच्या कोपर्डीमध्ये निर्भयाकांड घडल्याने राज्यात एकच खळबळ उडाली होती. त्यातच या भागातील शाळेच्या वाटेवर जंगल असल्याने मुलींच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला होता. त्यामुळे राज्य परिवहन महामंडळाकडून ही बससेवा सुरु करण्यात आली आहे. तसेच विद्यार्थिनींना शाळेचे पास देण्यात आले. सकाळी आणि सायंकाळी अशा दोन वेळी ही बस धावणार आहे.
एसटी महामंडळाकडून विद्यार्थिनींना शाळेत पास देण्यात आले असल्यानं शाळेत मुलींची पटसंख्या वाढण्यासही मदत झाली आहे.
“बसमुळे आता जंगल मार्गातून जाताना वाटणारी भीती टळली. त्याचबरोबर पावसाळ्यात भिजण्याचं, सायकलचं टायर पंक्चर होण्याचं संकटही टळलं आहे. टवाळखोरांपासून संरक्षण होण्यासही मदत झाली आहे” अशी भावना विद्यार्थ्यांनी व्यक्त केली.