पंढरपूर : राष्ट्रवादी काँग्रेसचे दिवंगत आमदार भारत भालके यांच्या निधनामुळे रिकाम्या झालेल्या पंढरपूर मंगळवेढा विधानसभा मतदारसंघातील पोटनिवडणुकीच्या कार्यक्रम निवडणूक आयोगाने जाहीर केला आहे. 17 एप्रिल रोजी मतदान होणार असून 2 मे रोजी मतमोजणी होऊन निकाल जाहीर केला जाणार आहे. 

Continues below advertisement


आज निवडणूक आयोगाने देशातील दोन लोकसभा आणि 14 विधानसभा पोटनिवडणुकीच्या कार्यक्रम जाहीर केला. त्यानुसार पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघात 23 मार्चपासून 30 मार्चपर्यंत उमेदवारी अर्ज दाखल करावे लागणार असून 31 मार्च रोजी अर्जांची छाननी होणार आहे. 3 एप्रिल रोजी उमेदवारी अर्ज मागे घेण्याची मुदत असून 15 एप्रिलपर्यंत उमेदवारांना प्रचार करता येणार आहे. या मतदारसंघात 17 एप्रिल रोजी मतदान होणार असून 2 मे रोजी मतमोजणीच्या होऊन निकाल जाहीर केला जाणार आहे. 


या मतदारसंघात आपल्या विजयाची हॅट्रिक करणारे आमदार भारत भालके यांचा आजारपणामुळे मृत्यू झाला होता. त्यांच्या निधनामुळे ही जागा रिक्त झाली होती. 
 
दरम्यान प्रशासनाने कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यंदा 324 ऐवजी 528 मतदान केंद्रावर मतदान घेण्याचे नियोजन केले आहे. एक हजारांपेक्षा जास्त मतदान असलेल्या मतदान केंद्राला 196 सहाय्यक मतदान केंद्रे स्थापन करण्यात आली आहेत. या निवडणुकीसाठी 15 जानेवारीपर्यंत 3 लाख 39 हजार 540 मतदारांची नोंदणी पूर्ण झाली होती. येत्या दोन दिवसात निवडणूक आयोगाकडून एकूण मतदारांची संख्या जाहीर केली जाईल.