Wardha: राज्याचे मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी आज 'हॅलो नव्हे, तर वंदे मातरम्' या अभियानाची सुरुवात झाल्याची घोषणा केली. यासंदर्भात कालच शासन निर्णय देखील निघाला आहे. आज वर्ध्यात बोलताना मंत्री सुधीर मुनगंटीवार म्हणाले की, काहींना प्रश्न पडला असेल जर आम्हाला जय महाराष्ट्र, जय भवानी, जय भीम किंवा जय श्री राम म्हणायचे असेल तर काय. तर त्यांना तसे ही बोलता येणार. कोणाला आई वडिलांचा नाव घ्यायचे असेल तरी चालेल, मात्र हॅलो बोलू नका. वंदे मातरम आपण सर्वांना प्राण प्रिय आहे. जर ते प्राण प्रिय असेल तर वंदे मातरम् म्हणा, असं सुधीर मुनगंटीवार म्हणाले. 'हॅलो नव्हे, तर वंदे मातरम्' या अभियानाच्या उद्घाटन सोहळ्यात ते बोलत होते. शासकीय कार्यालयांमध्ये आणि इतरही सर्व नागरिकांनी दूरध्वनी किंवा भ्रमणध्वनीवर बोलण्याची सुरुवात करताना 'हॅलो नव्हे, तर वंदे मातरम्' म्हणा, या राज्य सरकारच्या महत्त्वाकांक्षी अभियानाचा शुभारंभ आज गांधी जयंती दिनी, त्यांचीच भूमी म्हणजे वर्धा येथून झाली.
यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis), प्रमुख पाहुणे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील (Radhakrishna Vikhe Patil), वने व सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार (Sudhir Mungantiwar), विशेष मार्गदर्शक जलपुरूष मॅंगसेसे पुरस्कार प्राप्त डॉ. राजेंद्र सिंग, खासदार रामदास तडस, आमदार नागोराव गाणार, आमदार रामदास आंबटकर, आमदार अभिजित वंजारी, आमदार रणजीत कांबळे, आमदार दादाराव केचे, आमदार समीर कुणावार, आमदार पंकज भोयर यांची उपस्थिती आहे.
वंदे मातरम् हे गीत नाही, तर ही राष्ट्र आराधनाः मुनगंटीवार
'हॅलो नव्हे, वंदे मातरम्..' हे एक अभियान आहे. या अभियानात कुणावरही जबरदस्ती नाही. वंदे मातरम् हा स्वातंत्र्याचा मंत्र होता आणि आपण स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाच्या निमित्ताने या विषयाला भारत मातेच्या जाज्वल्य इतिहासाची आठवण करून देत आहोत. दूरध्वनी किंवा भ्रमणध्वीवर बोलताना 'वंदे मातरम्' उच्चारायचे आहे. हे केवळ दोन साधे शब्द नाहीत, तर ऊर्जा व स्फूर्ती देणारे हे शब्द आहेत. हे माते मी तुला प्रणाम करतो, असा या शब्दांचा अर्थ असल्याचे प्रतिपादन सुधीर मुनगंटीवार यांनी केले. 'मातृभूमी से बढकर कोई चंदन नही होता और वंदे मातरम् से बढकर मातृभूमी को कोई वंदन नही होता.', हे माजी पंतप्रधान स्वर्गीय अटल बिहारी वाजपेयींचं वाक्य प्रसिद्ध आहे. वेदमंत्राहून आम्हा वंद्य वंदे मातरम्. वंदे मातरम् हे गीत नाही, तर ही राष्ट्र आराधना आहे. देवाच्या मुखातून निघालेल्या वेदमंत्रापेक्षाही राष्ट्रभक्त शहिदांच्या ओठांतून निघालेले 'वंदे मातरम्' हे शब्द आम्हाला प्राणप्रिय आहेत. हे शब्द म्हणजे भूमीला नमन, वंदन आहे. यातून संकल्प करण्याची ऊर्जा मिळते. स्वातंत्र्य लढ्यात ऊर्जा देणारे हे शब्द, स्वातंत्र्य ते सुराज्य या दिशेने प्रवास करण्याची शक्ती देतात, असे मंत्री सुधीर मुनगंटीवार म्हणाले.
आज वर्धेत जिल्हाधिकारी कार्यालयाचे उद्घाटन, वंदे मातरम् अभियानाचे उद्घाटन राष्ट्रनेता ते राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या 153 व्या जयंती वर्षानिमित्त सेवा पंधरवाड्याचा समारोप, नदीला जाणून घेऊ या - 75 नद्यांची परिक्रमा, एमगिरी असे चार कार्यक्रम एकत्र घेण्यात येत आहे.
इतर महत्त्वाच्या बातम्या