Satyajeet Tambe Suspended : नाशिक पदवीधर निवडणुकीसाठी (Nashik Graduate Constituency) बंडखोरी करणारे सत्यजीत तांबे (Satyajeet Tambe) यांचं अखेर काँग्रेसमधून निलंबन करण्यात आलं आहे. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी त्याबाबतची माहिती दिली. महाविकास आघाडीच्या नेत्यांनी आज एकत्र पत्रकार परिषद घेत, पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीबाबत आपली भूमिका जाहीर केली. काँग्रेसकडून नाना पटोले, शिवसेना ठाकरे गटाकडून विरोधी पक्षनेते अंबादास दानवे आणि राष्ट्रवादी काँग्रेसकडून जितेंद्र आव्हाड यांनी या पत्रकार परिषदेला उपस्थिती लावली. 


सत्यजीत तांबे यांनी नाशिक पदवीधर निवडणुकीसाठी अपक्ष उमेदवारी अर्ज भरला आहे. त्यांचे वडील सुधीर तांबे यांना उमेदवारी देऊनही त्यांनी अर्ज दाखल केला नाही. त्यामुळे काँग्रेसचा अधिकृत उमेदवारच या निवडणुकीत नाही. त्यामुळे अपक्ष उमेदवार शुभांगी पाटील यांना महाविकास आघाडीने पाठिंबा दिला आहे. 


सत्यजीत तांबे यांचं निलंबन 


दरम्यान, आजच्या पत्रकार परिषदेत नाना पटोले यांनी सत्यजीत तांबे यांचं निलंबन करत असल्याचं सांगितलं. "तांबे परिवाराचं काय झालं याच्याशी आम्हाला आता काही भाष्य करायचं नाही. त्यांना आम्ही पक्षातून निलंबित केलं आहे. थोरात साहेब आमचे नेते आहेत. ते सध्या रुग्णालयात आहेत. त्यांच्याशी आम्ही नंतर चर्चा करु. त्यांची काय भूमिका आहे ते पाहू. मात्र सध्या सत्यजीत तांबे यांना पक्षातून निलंबित केलं आहे", असं नाना पटोले म्हणाले.


शुभांगी पाटील यांना पाठिंबा


दरम्यान, नाशिक पदवीधर निवडणुकीसाठी महाविकास आघाडीने अधिकृतपणे शुभांगी पाटील यांना पाठिंबा जाहीर केला. नाशिक आणि अमरावती पदवीधर तर औरंगाबाद, नागपूर आणि कोकणात शिक्षक मतदारसंघासाठी निवडणूक होत आहे. यासाठी 30 जानेवारी 2023 रोजी मतदान होणार आहे. तर, दोन फेब्रुवारीला मतमोजणी होणार आहे. 


महाविकास आघाडीचा कुठे कुणाला पाठिंबा? 


 नाशिक पदवीधर मतदारसंघ - शुभांगी पाटील
अमरावती पदवीधर मतदारसंघ - धिरज लिंगाडे 
 नागपूर शिक्षक मतदारसंघ- सुधाकर अडबाले
कोकण शिक्षक मतदारसंघ- बाळाराम पाटील
औरंगाबाद शिक्षक मतदारसंघ - विक्रम काळे


पुणे पोटनिवडणूक काँग्रेस लढवणार?


दरम्यान, पुण्यातील कसबा आणि पिंपरी चिंचवड इथे विधानसभेची पोटनिवडणूक जाहीर झाली आहे. ही निवडणूकही काँग्रेस लढण्याची शक्यता आहे. पुण्यातील कसबा पेठ विधानसभा मतदारसंघाच्या आमदार मुक्ता टिळक आणि चिंचवड विधानसभा मतदारसंघाचे आमदार लक्ष्मण जगताप यांचे निधन झाल्याने या दोन मतदारसंघात 27 फेब्रुवारीला पोटनिवडणूक होणार आहे.  


एखाद्या सदस्याचे निधन झालं तर तिथे निवडणूक होऊ द्यायची नाही, अशी परंपरा आहे. मात्र भाजपने ही परंपरा मोडली. त्यांचा काय प्रस्ताव येतो त्यावर निर्णय घेऊ, असं नाना पटोले म्हणाले.



VIDEO : Satyajeet Tambe Suspended : सत्यजित ताबेंचं काँग्रेसमधून निलंबन, नाना पटोले यांची माहिती




संबंधित बातमी


शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघातील लढती ठरल्या, 5 मतदारसंघात कोण-कुणाविरुद्ध भिडणार?