Devendra Fadnavis on Satej Patil: विनाअनुदानित शिक्षकांनी गेल्या चार दिवसांपासून आझाद मैदानात आंदोलन सुरू केल्यानंतर आता महायुती सरकार आणि महाविकास आघाडीच्या नेत्यांमध्ये आरोप प्रत्यारोपांच्या फैरी सुरू झाल्या आहेत. आज (9 जुलै) राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी आंदोलनकर्त्या विनाअनुदानित शिक्षकांची आझाद मैदानात जाऊन भेट घेऊन त्यांना पाठिंबा दिल्यानंतर आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या स्थितीला महाविकास आघाडी सरकार जबाबदार असल्याचा आरोप केला आहे. विधानपरिषदेत काँग्रेसचे गटनेते आमदार सतेज पाटील यांनी प्रश्न उपस्थित केल्यानंतर फडणवीस यांनी विधानपरिषदेत महाविकास आघाडीकडे बोट केले. सतेज पाटील म्हणाले की, आझाद मैदानात शिक्षक बसले आहेत. टप्पा अनुदानाचा निर्णय सरकारने घेतला, पण आचारसंहिता जाहीर होईपर्यंतचा हा जीआर आहे असा आम्हाला संशय आहे. गिरीश महाजन तिथे गेले त्यांनी बैठक लावू असं आश्वासन दिलं. सकाळपासून सरकारच्या बोलावण्याची वाट ते बघत आहेत. मुख्यमंत्र्यांनी त्यांना भेटीसाठी बोलावावं. यानंतर विधानपरिषदेत बोलताना फडणवीस यांनी महाविकास आघाडीवर अंगुलीनिर्देश केला. 

सतेज पाटील तुमचं सरकार जबाबदार

देवेंद्र फडणवीस म्हणाले की, शिक्षकांच्या या परिस्थितीला सतेज पाटील तुमच सरकार जबाबदार आहे. तुम्ही सर्वांना सरसकट विना अनुदान संस्थांना परवानगी दिली. त्यानंतर कायम शब्द तुम्ही काढला. अनुदानाचा पहिला टप्पा आमच्या सरकारने दिला. तुमचं महाविकास आघाडी सरकार असताना तुम्ही काय केलं? काहीच केलं नाही. आम्हीच टप्पा अनुदान देत आहोत. परंतु तुम्ही आझाद मैदानात जाऊन राजकारण करत आहात. हे राजकारण कारण योग्य नाही. मी गृहमंत्री आहे कोण काय करत हे आम्हाला दिसतं. आम्ही त्यांच्याबाबत निर्णय घेणार आहोत. आम्ही त्यांना आज बोलावलं देखील आहे. 

शरद पवारांनी घेतली आंदोलक शिक्षकाची भेट 

दरम्यान, शिक्षकांची भेट घेतल्यानंतर शरद पवार म्हणाले की शिक्षकांच्या महत्वाच्या मागण्या आहेत. त्यासाठी त्यांना संघर्ष करण्याची वेळ येत आहे. शिक्षक आंदोलनासाठी येऊन चिखलामध्ये बसत आहेत हे बरोबर नाही. त्यांनी पुढे सांगितलं की तरतूद न करण्यात आलेला आदेश हा कचरा टाकण्यासारखाच आहे. ज्ञानदाना करणाऱ्या शिक्षकांवर अशा पद्धतीने संघर्ष करण्याची वेळ येऊ देऊ नका. शिक्षकांच्या न्याय हक्कांसाठी खांद्याला खांदा लावून आपण काम करू, अशी ग्वाही त्यांनी दिली. त्यांनी सरकारकडे एक दिवसात शिक्षकांचा प्रश्न मार्गी लावण्याची मागणी केली. 

इतर महत्वाच्या बातम्या