कोल्हापूर : कोल्हापूर लोकसभेची (Kolhapur Loksabha) जागा कोणाकडे जाणार? हा महाविकास आघाडीमधील सस्पेन्स कायम असताना कोल्हापूर काँग्रेस जिल्हाध्यक्ष आमदार सतेज पाटील (Satej Patil on Kolhapur Loksabha) यांनी सूचक वक्तव्य केलं आहे. सतेज पाटील यांनी शनिवारी कोल्हापुरात बोलताना कोल्हापूर लोकसभेबाबत महविकास आघाडीचे पत्ते पिसले असल्याचे म्हणाले. 


शासकीय योजनांसाठी जमा केलेला डाटा विशिष्ट पक्षाकडे कसा? 


सतेज पाटील म्हणाले की, कोल्हापूर लोकसभेला डाव सुद्धा आखला आहे. डावातील एक्का महाविकास आघाडीकडे असेल. महायुतीमध्ये सगळं अलबेल नसल्याचाही दावाही सतेज पाटील यांनी केला. दरम्यान, शासकीय योजनांसाठी जमा केलेला डाटा खासगी कॉल सेंटर आणि विशिष्ट पक्षाकडे कसा? असा गंभीर आरोप पाटील यांनी भाजपवर केला. 


त्यांनी सांगितले की, संबधित पक्षाकडून निवडणुकीच्या प्रचारासाठी डाटाचा वापर केला जात आहे. मी याबाबत निवडणूक आयोगाकडे तक्रार करणार आहे. निवडणूक आयोगाने कारवाई करावी, अशी मागणी त्यांनी केली. पीएम किसान,उज्वला गॅस अशा योजनांच्या माहितीसाठी खासगी कॉल सेंटर मधून नागरिकांना फोन येत असल्याचा दावा पाटील यांनी केला.  


तर यापेक्षा वाईट गोष्ट नाही


दुसरीकडे, शिंदे गटात झालेल्या धक्काबुक्कीवर सतेज पाटील यांनी टीका केली. महाराष्ट्राच्या इतिहासात यापूर्वी कधी हाणामारीच्या घटना घडलेल्या नाहीत. सत्ताधारी आमदारांमध्ये हाणामारीचा प्रकार पहिल्यांदाच घडला आहे. विधिमंडळातील महत्त्वाच्या ठिकाणचे सीसीटीव्ही उपलब्ध नाही हे वाईट असल्याचे ते म्हणाले. सुरक्षेच्या दृष्टीने असा प्रकार विधिमंडळात घडत असेल तर यापेक्षा वाईट गोष्ट नसल्याचे ते म्हणाले. उद्या चुकीची घटना घडली तर त्याचे सीसीटीव्ही मिळणार का? अशी विचारणा त्यांनी केली. 


आमदार संजय गायकवाड यांनी केलेल्या अमानुष मारहाणीवर ते म्हणाले की, लोकप्रतिनिधी कायदा हातात घेत आहेत.  कारवाई होत नसल्यानेच त्यांचे धाडस वाढले आहे. संरक्षण असल्याचा समज हा लोकशाहीला घातक आहे. राज्यातील कायदा आणि सुव्यवस्था पूर्णपणे ढासळली आणि बिघडली असल्याचा आरोप त्यांनी केला. 


कोल्हापूरची जागा आम्ही शाहू महाराजांसाठी ठेवली! 


दुसरीकडे, आगामी लोकसभा निवडणुकीसाठी कोल्हापूर लोकसभा (Kolhapur Loksabha) मतदारसंघातून महाविकास आघाडीने एकमताने करवीर संस्थानचे श्रीमंत छत्रपती शाहू महाराज (Shahu Maharaj) यांच्या नावावर महाविकास आघाडीने जवळपास शिक्कामोर्तब केलं आहे. याबाबतचे स्पष्ट संकेत काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole on Shahu Maharaj) यांनी दिले आहेत. कोल्हापूरची जागा शाहू महाराजांसाठी आम्ही ठेवली आहे ते कोणत्या चिन्हावरती लढतील हे आत्ताच मी सांगणार नाही, असे स्पष्टपणे नाना पटोले यांनी दोन दिवसांपूर्वीच म्हटले होते. 


इतर महत्वाच्या बातम्या