सातारा: कोर्टाच्या आदेशानंतरही साताऱ्याचे खासदार उदयनराजे  भोसले आपल्या भूमिकेवर ठाम आहेत. कुठल्याही परिस्थितीत डॉल्बी वाजवणारच आणि सातारा शहरातील गणपतींचं मंगळवार तळ्यातच विसर्जन होणार, अशी भूमिका उदयनराजेंनी घेतली आहे.

न्यायालयाचा अवमान झाला तरी त्यासाठी मी समर्थ आहे, मी पळपुटा नाही, कार्यकर्त्यांच्या पाठीशी ठाम उभा राहणार असंही उदयनराजे म्हणाले.

दुसरीकडे डॉल्बी वाजवू न देण्याच्या भूमिकेवर पोलिसही ठाम आहेत. दोनच दिवसांपूर्वी साताऱ्यात कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलिस महानिरीक्षक विश्वास नांगरे पाटील यांनी पत्रकार परिषद घेऊन पोलिसांची भूमिका स्पष्ट केली होती.

गणेशोत्सव शांततेत साजरा केला जाईल असा विश्वास नांगरे पाटील यांनी व्यक्त केला होता. हायकोर्टाच्या नियमांच्या अधीन राहून हा उत्सव साजरा करावा असं आवाहन त्यांनी केलं होतं.





कोर्टाचा नकार

गणपती विसर्जनाच्या मिरवणुकीतील डीजे आणि डॉल्बीच्या वापरास परवानगी देण्यास मुंबई उच्च न्यायालयाने तूर्तास नकार दिला आहे. मात्र साऊंड सिस्टिमच्या वापरावर सरसकट बंदी घालणं कितपत योग्य आहे? असा सवाल उच्च न्यायालयाने राज्य सरकारला विचारला आहे. सण-उत्सवातील गोंगाटाकडे आम्ही डोळे बंद करून पाठ फिरवू शकत नाही असं कोर्टानं म्हटलंय.

याबाबत पुढील सुनावणी 19 सप्टेंबरला होणार आहे.