सातारा : लग्न होत नाही म्हणून गळफास लावून आत्महत्या केल्याची नुकतीच घटणा साता-यातील नागठाणे येथे घडली आहे. त्याने लिहून ठेवलेल्या चिठ्ठीमुळे मुलींच्या संख्यांचा विषय पुढे आला आहे. शिवाय मुलींच्या अपेक्षा देखील दिवसें दिवस वाढत असल्याचेही समोर आले आहे.


सह्याद्रींच्या पर्वत रांगामधील ढोरोशी गाव हा दुर्गम भाग असल्यामुळे सुर्याजी मगर आणि त्यांची पत्नी विमल हे गाव सोडून नागठ्याण्यात राहण्यासाठी आले. अवघ्या काही वर्षातच सुर्याजींचा मृत्यू झाला. विमल यांना योगेश हा एकुलता एक मुलगा होता. काबाड कष्ट करुन त्यांनी योगेशला वाढवले. शेतजमिन विकली नविन घर बांधले. हा विकास होत असताना योगेश वयात आला. योगेशने टेलरिंगचा व्यवसाय सुरु केला. योगेशला मुली पाहण्यास सुरूवात केली. परंतु योगेश टेलरिंगचा व्यवसाय करत असल्यामुळे आणि घरच्या परिस्थितीमुळे त्याला मुलगी देण्यासाठी कोणीच तयार नव्हते. याच नैराश्यातून त्याने हे जग सोडण्याचा निर्णय घेतला आणि त्याने व्यवसाय करत असलेल्या त्याच गाळ्यात गळफास लावून आत्महत्या केली.


वंशाला दिवा पाहिजेत असे म्हणत गर्भाशयातच मुलींना मारण्याचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत गेले आहे. मुलींच्या आणि मुलांच्या संखेत मोठी तफावत दिसत असताना मुलींच्या शिक्षणाचा दर्जा वाढत गेला. तसेच मुलींच्या अपेक्षा वाढत गेल्या. शेतकरी नवरा नको, व्यवसायीक मुलगा नको, असे म्हणत शेतकरी मुल, व्यवसायीक मुलांची लग्न रखडत गेली आणि याचाच एक हा योगेश बळी ठरला.


मुला मुलींचा जन्मदरातील आजही मोठी तफावत असून ही तफावत दूर करण्यासाठी आजही अनेक समाजिक संस्था काम करताना पहायला मिळत आहेत. या तफावतीचा हा परिणाम दिसत असला तरी आजच्या काळात शेतकरी मुलांना आणि व्यवसायीक मुलांना मुली देण्यासाठी पालकवर्ग नाखूश आहे. त्यात सरकारी नोकरदाराचा हट्ट करणा-या या पालकवर्गांसाठी नोकरदार मुलगा शोधून आणायची सध्या मोठा प्रश्न आहे. लग्नामुळे योगेशसारखे बळी जर या समाजात जात असतील तर मुला मुलींमधील जन्मदराची तफावत भरुन काढण्यासाठी सरकारने आणखी ठोस पावले उचलली पाहिजेत.