पाणीवाटपाचा वाद शिगेला, साताऱ्यात सख्ख्या भावाची हत्या
एबीपी माझा वेब टीम | 16 Apr 2016 12:15 PM (IST)
सातारा : विहिरीतील पाणीवाटपाच्या वादातून भावानेच भावाची हत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. रक्ताच्या नात्याला काळीमा फासणारी ही घटना साताऱ्याच्या खटाव तालुक्यातील निमसोड गावात घडली आहे. बबन माळी असं हत्या झालेल्या इसमाचं नाव असून हत्येप्रकरणी पोलिसांनी बबन माळी यांचा भाऊ रामचंद्र माळी आणि त्याच्या दोन मुलांना अटक केली आहे. गेल्या काही दिवसांपासून बबन आणि रामचंद्र या दोन भावांमध्ये वडिलोपार्जित विहिरीतील पाणीवाटपावरुन वाद सुरू होते. घटनेच्या दिवशी बबन माळी पाणी सोडण्यासाठी विहिरीवर गेले असता आरोपींनी त्यांची गळा चिरुन हत्या केली. गुन्हा लपवण्यासाठी आरोपींनी बबन यांचा मृतदेह जमिनीखाली पुरला. मात्र पोलिसांनी मोठ्या शिताफीनं तपास करत फक्त 12 तासांत गुन्ह्याचा छडा लावला.