सातारा : दिवाळी अवघ्या काही दिवसांवर आली आहे. सर्वत्र दिवाळीच्या सणाची लगभग सुरु आहे. दिवाळीच्या निमित्तानं घराची सजावट, रोषणाई करण्याची कामं देखील सुरु आहेत. मात्र रोषणाई करताना सावधगिरी बाळगणं खूप गरजेचं आहे. अन्यथा आपल्या जीवावर देखील बेतू शकतं. सातारा शहरात अशीच एक धक्कादायक घटना घडली. दिवाळी निमित्ताने इमारतीला रोषणाई करताना संपूर्ण कुटुंबाला वीजेचा शॉक लागून सर्वजण जखमी झाले. मात्र यात कुटुंब प्रमुखाचा जागीच मृत्यू झाला. या घटनेनं शोककळा पसरली आहे.   सुनील पवार असं या घटनेत मृत्यू झालेल्या व्यक्तिचं नाव आहे. 


दिवाळी निमित्ताने घराच्या दारातच सुनील पवार यांनी त्यांच्या दोन चिमुकल्या मुलांसाठी सुंदर किल्ला उभारला. वडिलांनी बनवलेल्या या किल्यामुळे मुल आनंदान भारावली होती. कपड्यांची खरेदीही झाली. घरात फराळाची तयारी सुरु होती. त्यात सुनिल यांनी इमारतीला लायटिंग करायला घेतलं आणि घात झाला. आनंदानं दिवाळी सण करण्याच्या प्रयत्नात असणाऱ्या कुटुंबावर नियतीनं घाला घातला. घरासमोरील एमएससीबीच्या तारेला लायटिंगच्या माळेचा धक्का लागला आणि सुनिल यांचा जागीच मृत्यू झाला. तर त्यांना वाचण्याच्या प्रयत्नात असलेली दोन चिमुकली मुल आणि पत्नी गंभीररित्या भाजले आहेत.


सातारा शहरातील मोरे कॉलनीत राहणारे हे सुनील पवार हे या इमारतीमध्ये भाडेकरु म्हणून राहतात. काम धंदा करुन कुटुंब चालवणाऱ्या या पवार कुटुंबातील सुनिल पवार हे काल सायंकाळी इमारतीला लायटिंग करत होते. ते वायर खाली टाकत होते. ती वायर चुकून इमारतीच्या समोरून जाणाऱ्या हाय होल्टेजच्या वायरवर पडली आणि सुनिल पवार जागीच कोसळले. त्यांचा मुलगा ओम हा त्यांना वाचवण्यासाठी आला आणि तोही गंभीर जखमी झाला. त्याचबरोबर सुनिलची पत्नी मंजूषा आणि श्रवण असे दोघे नंतर जखमी झाले. सुनील यांचा उपचारापूर्वीच मृत्यू झाला तर या तिघांना तातडीने खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले आहे.  या घटनेने संपुर्ण मोरे कॉलनीचा परिसर हादरला आहे.


 दिवाळीच्या तोंडावर या पवार कुटुंबावर हे ओढावलेले संकट खूपच भयानक आहे. मात्र थोडी काळजी घेतली असती तर हा अनर्थ घडला नसता. त्यामुळे प्रत्येकाने दिवाळीच्या निमित्ताने आपल्या घराला झगमगाट करताना काळजी घ्या. सोबतच फटाके फोडताना काळजी घेणंही आवश्यक आहे.