सातारा : जम्मू काश्मिरमध्ये पाकिस्तानी सैन्यानं केलेल्या गोळीबारामध्ये शहीद झालेले साताऱ्याचे सुपुत्र शहीद दीपक घाडगे यांच्या पार्थिवावर लष्करी इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले.


साताऱ्यातील फत्यापूर गावात हजारोंच्या उपस्थितीत शनिवारी अंत्यसंस्कार झाले. अत्यंत शोकाकुल वातावरणात दीपक घाडगे यांचे वडील जगन्नाथ घाडगे यांनी आपल्या वीरपुत्राला मुखाग्नी दिला. यावेळी पंचक्रोशीतल्या ग्रामस्थांसह पशुसंवर्धन मंत्री महादेव जानकर, पालकमंत्री विजय शिवतारे, सदाभाऊ खोत, आ. शिवेंद्रराजे भोसले उपस्थित होते.

9 मार्च रोजी जम्मू काश्मीरातल्या पूँछमध्ये पाकिस्तांनी सैन्यानं केलेल्या गोळीबारात जवान दीपक घाडगे शहीद झाले होते. त्यांच्या पश्चात आई-वडील, पत्नी आणि दोन मुलं आहेत.

जम्मूत पाकिस्तानच्या गोळीबारात साताऱ्याच्या जवानाला वीरमरण


दीपक घाडगे यांची परिस्थिती अत्यंत हलाखीची असताना त्यांचे वडील जगन्नाथ घाडगे मोलमजुरी करत होते, तर आई शोभा या आठवडी बाजारात भाजीपाला विकून कुटूंबाचा उदनिर्वाह करत होत्या.

2010 साली कोल्हापूर येथील सैन्यभरतीत 15 मराठा लाईफ इनफन्ट्रीमध्ये दीपक भरती झाले. बेळगावात 6 महिने प्रशिक्षण झाल्यावर जम्मूमध्ये 2 वर्ष आणि अहमदाबादमध्ये 4 वर्ष सेवा त्यांनी केली.

2013 साली निशा रांजणे यांच्याशी दीपक यांचा विवाह झाला. त्यांना 3 वर्षांचा शंभुराज आणि एक वर्षांची परी अशी दोन मुलं आहेत. गेल्या महिन्यातच रजेवर आल्यानंतर पुन्हा जम्मु कश्मीर मधील पुच्छ सेक्टर मध्ये ते रुजू झाले होते.