औरंगाबाद : पर्यटनाची राजधानी असलेल्या औरंगाबाद शहराची कचराकुंडी झाली आहे. गेल्या पाच दिवसांपासून नारेगावच्या नागरिकांनी कचरा टाकण्यास विरोध केल्याने शहरातील रस्त्यांवर 2 हजार टनांपेक्षा अधिक कचऱ्याचे डोंगर उभा राहू लागले आहेत. प्रशासन आणि सत्ताधारी यावर अजूनही तोडगा काढू शकले नाहीत.




देश-विदेशातले पर्यटक औरंगाबाद शहरातलं हे घाणेरडं चित्र पाहत आहेत. शहरातील रस्ता असो वा गल्लीबोळ, सगळीकडे कचऱ्याचं साम्राज्य पसरलं आहे. सलग सहाव्या दिवशीही कचराकोंडीवर तोडगा काढण्यात औरंगाबाद महापालिका अपयशी ठरली आहे. नारेगावला जिथे महापालिकेचा कचरा डेपो आहे, ते ग्रामस्थ अजूनही डेपोत कचरा न आणू देण्यावर ठाम आहेत.



तब्बल 15 वर्षांपूर्वी हायकोर्टाने नारेगावचा कचरा डेपो बंद करण्याचे आदेश दिले होते. महापालिकेला पर्यायी जागा मिळाली नाही, त्यामुळे नारेगावचे लोक रस्त्यावर उतरले आणि शहराची कचराकोंडी झाली. आज गुरुसाहणी नगर भागातील एका नागरिकांने कचरा उचलणाऱ्या कर्मचाऱ्याला मारहाण केल्याचीही घटना घडली.

दिवसेंदिवस कचऱ्याचा प्रश्न गंभीर होत चालला आहे. नागरिकांचं आरोग्य धोक्यात आलं आहे. त्यामुळे महापौर नंदकुमार घोडेले यांनी महापालिकेच्या रुग्णालयातील डॉक्टरांच्या राजाही रद्द केल्या आहेत.



महापालिकेच्या जेवढ्या कचरा उचलणाऱ्या गाड्या आहेत, तेवढ्या गाड्या कचरा भरून उभा आहेत. मात्र हा कचरा कुठे टाकायचा हा प्रश्न आहे. त्यामुळे कचऱ्याची दुर्गंधी येऊ नये म्हणून, त्यावर पावडर टाकली जात आहे, पण हे किती दिवस चालणार, असा प्रश्न आहे.

औरंगाबाद महापालिकेवर 1988 पासून शिवसेना आणि भाजपची सत्ता आहे. त्याच्या आधीपासूनच नारेगावला कचरा टाकला जातो. मात्र, तरीही कुठल्याच महापौरांनी कचऱ्याचा प्रश्न कायमस्वरूपी सोडवावा म्हणून पुढाकार घेतला नाही. प्रशासनही कचरा डंप करण्यातच धन्यता मानत राहिलं आणि त्याचाच भस्मासूर झाल्याने आता शहर कचऱ्याने वेढलं आहे. आता महापालिका पुन्हा नारेगाववासियांचे पाय पकडणार आहे, त्यावरच सध्या तोडगा अवलंबून आहे.