Satara Crime News : सातारा जिल्ह्यातील प्रसिद्ध पर्यटन स्थळ असलेल्या पाचगणीमध्ये खळबळजनक घटना समोर आली आहे. पाचगणी पोलिसांना वाहन तपासणी दरम्यान पर्यटकांच्या गाडीतून तब्बल 42 लाख रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे. पाचगणी येथे अमली पदार्थांचा वापर केला जात असल्याची गोपनीय माहिती पोलिसांना मिळाली होती. या माहितीच्या आधारे पोलिसांनी कारवाई केली आहे.
एकूण 42 लाख रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त
पाचगणी पोलिसांनी गोपनीय माहितीच्या आधारे तपासणी केली असता एका गाडीमध्ये कॅप्सूल सह 13 ग्रॅम कोकेन जप्त केले आहे. ज्याची आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत किंमत 5 लाख रुपये आहे, इतर सामग्री मिळून एकूण 42 लाख रुपये किमतीचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे. या प्रकरणी 10 संशयित आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे. हे सर्व आरोपी पर्यटनाच्या बहाण्याने पाचगणीत आले होते. पाचगणी पोलिस आणि स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी अमली पदार्थ विरोधी कायद्यांतर्गत (NDPS Act) गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. हे अमली पदार्थ कुठून आणले गेले आणि यामध्ये आणखी कोणाचे मोठे रॅकेट सक्रिय आहे का? याचा तपास आता सातारा पोलीस करत आहेत.
सातारा जिल्ह्यातील सावरी गावात पोलिसांची धाड, 45 किलो ड्रग्जचा साठा जप्त
सातारा जिल्ह्यातील सावरी गावातील असणाऱ्या शेडवर मुंबई पोलिसांनी टाकलेल्या धाडीत 45 किलो ड्रग्जचा साठा सापडला होता. या ड्रग्जची बाजारपेठेतील किंमत 145 कोटी रुपये इतकी आहे, त्या ठिकाणी काम करत असलेल्या तिघांना एकनाथ शिंदे यांचा भाऊ प्रकाश शिंदे याच्या जावळी तालुक्यातील हॉटेल तेज यश मधून जेवण जात असल्याचा असा खळबळजनक आरोप ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी केला. प्रकाश शिंदे (Prakash Shinde) हे एकनाथ शिंदे यांचे सख्खे भाऊ आहेत. त्यांनी 2017 साली ठाण्यातून नगरसेवकपदाची निवडणूक लढवली होती. साताऱ्याचे पोलीस अधीक्षक तुषार दोशी (Tushar Doshi) यांनी ही माहिती लपवून ठेवली. पोलिसांनी याठिकाणी कारवाई केली पण ड्रग्जशी संबंधित ज्या तीन लोकांची नावं एफआयआरमध्ये असायला पाहिजे होती, ती नाहीत, असा दावा सुषमा अंधारे (Sushma Andhare) यांनी केला. एखाद्या प्रकरणात पोराचं नाव आलं तर बापाचा राजीनामा मागितला जात असेल तर मग ड्रग्ज प्रकरणात भावाचे नाव आल्यावर एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांचाही राजीनामा घेतला पाहिजे, अशी मागणी सुषमा अंधारे यांनी केली.
महत्वाच्या बातम्या:
सुषमा अंधारेंकडून 145 कोटींच्या ड्रग्सचे गंभीर आरोप; प्रकाश शिंदेंची पहिली प्रतिक्रिया, आरोप फेटाळले