Dhananjay Munde In Delhi: क्रीडामंत्री माणिकराव कोकाटे यांच्याविरोधात नाशिक जिल्हा न्यायालयाने अटक वॉरंट जारी केले आहे. त्यामुळे कोकाटे यांना कोणत्याही क्षणी अटक होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. त्यांच्या मंत्रीपदासह आमदारकीवर सुद्धा टांगती तलवार आहे. मंगळवारी नाशिक उच्च न्यायालयाने सदनिका घोटाळा प्रकरणात कनिष्ठ न्यायालयाने सुनावलेली दोन वर्षांची शिक्षा कायम ठेवली होती. 

Continues below advertisement

कोकाटे यांच्याविरोधात अटक वॉरंट जारी

या निर्णयानंतर सदनिका घोटाळा प्रकरणातील याचिकाकर्त्या अंजली दिघोळ राठोड यांनी माणिकराव कोकाटे यांच्याविरोधात अटक वॉरंट जारी करण्यासाठी नाशिक जिल्हा न्यायालयात अर्ज दाखल केला होता. या अर्जावर आज सुनावणी घेण्यात आली. दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकल्यानंतर न्यायालयाने माणिकराव कोकाटे यांच्याविरोधात अटक वॉरंट जारी करण्याचा आदेश दिला. न्यायालयाने स्पष्ट शब्दांत सांगितले की, कायद्यापुढे सर्वजण समान आहेत. तो मंत्री असो वा सामान्य नागरिक. कोर्टाने माणिकराव कोकाटे यांनी तात्काळ पोलिसांसमोर हजर व्हावे किंवा पोलिसांनी त्यांना अटक करावी, असे निर्देश दिले आहेत. दुसरीकडे, माणिकराव कोकाटे यांनी उच्च न्यायालयात धाव घेतली असून उद्या (18 डिसेंबर) सुनावणीची मागणी करण्यात आली आहे.

माणिकराव कोकाटे संकटात, धनुभाऊ दिल्लीत 

दरम्यान, माणिकराव कोकाटे संकटात आल्यानंतर माजी मंत्री धनंजय मुंडे यांच्या दिल्ली दौऱ्याची चर्चा रंगली आहे. धनुभाऊंचा हा दौरा पूर्वनियोजित होता की घरवापसीसाठी उत्तम 'मुहूर्त' मानत फिल्डिंग लावली? याची चर्चा रंगली आहे. धनंजय मुंडे यांनी संसदेत वरिष्ठ नेत्यांच्या भेटीगाठी करत चर्चा केल्याची माहिती आहे. एनडीएमधील बहुंताश वरिष्ठ नेते दिल्लीत असल्याने मंत्रीपदासाठी धनुभाऊ चर्चा करत आहेत का? असा सुद्धा प्रश्न उपस्थित झाला आहे.

Continues below advertisement

अटक वॉरंट टाळण्यासाठी जोरदार युक्तिवाद

दरम्यान, माणिकराव कोकाटे यांच्या वतीने अॅडव्होकेट मनोज पिंगळे यांनी अटक वॉरंट टाळण्यासाठी जोरदार युक्तिवाद केला. कोकाटे यांच्याबाबत सहानुभूतीने विचार करावा, अशी विनंती त्यांनी न्यायालयाला केली. मात्र न्यायालयाने हा युक्तिवाद फेटाळला. माणिकराव कोकाटे यांनी काल न्यायालयात हजर राहणे अपेक्षित होते. मात्र ते गैरहजर राहिल्याने न्यायालयाने त्यांना फटकारले. याचिकाकर्त्या अंजली दिघोळ यांनी, अटक टाळण्यासाठीच कोकाटे कालच्या सुनावणीला हजर राहिले नाहीत, असा आरोप केला. आजच्या सुनावणीदरम्यान कोकाटे यांच्या वकिलांनी ते सध्या रुग्णालयात उपचार घेत असल्याची माहिती दिली. मात्र यासंदर्भात कोणतीही वैद्यकीय कागदपत्रे न्यायालयात सादर करण्यात आलेली नाहीत. उलट, याचिकाकर्त्यांचे वकील अॅडव्होकेट आशुतोष राठोड यांनी माणिकराव कोकाटे हे राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत उपस्थित असल्याचा दावा केला.

इतर महत्वाच्या बातम्या