प्रतिष्ठेच्या मलकापूर नगरपरिषद निवडणुकीत काँग्रेसचा एकहाती विजय
एबीपी माझा वेब टीम | 28 Jan 2019 03:05 PM (IST)
पृथ्वीराज चव्हाण आणि अतुल भोसले या दोन दिग्गजांच्या पॅनलमुळे कराडमधील मलकापूर नगरपरिषदेची निवडणूक चांगलीच रंगली होती.
सातारा : माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण यांच्यासाठी प्रतिष्ठेची ठरलेल्या मलकापूर नगरपरिषद निवडणुकीत काँग्रेसचा विजय झाला आहे. काँग्रेसच्या बालेकिल्ल्याला खिंडार पाडण्यात भाजपला अपयश आलं आहे. मलाकापूर नगरपरिषदेत काँग्रेसने एकहाती सत्ता मिळवली. पृथ्वीराज चव्हाण आणि अतुल भोसले या दोन दिग्गजांच्या पॅनलमुळे कराडमधील मलकापूर नगरपरिषदेची निवडणूक चांगलीच रंगली होती. कोणाचं पॅनल लागणार याकडे संपूर्ण सातारकरांचं लक्ष लागलं होतं. काँग्रेसने 19-5 अशा फरकाने भाजपच्या अतुल भोसलेंच्या पॅनलचा पराभव केलाच शिवाय नगराध्यपदाची माळही काँग्रेसच्याच गळ्यात पडली. काँग्रेसला 14 जागा तर भाजपला 5 जागांवर विजय मिळवता आला. नीलम येडगे काँग्रेसच्या चिन्हावर नगराध्यक्षपदी निवडून आल्या. त्यांनी भाजपच्या चिन्हावर उभ्या असलेल्या सारिका गावडे यांचा 270 मतांनी पराभव केला. मलकापूर नगरपरिषद निकाल एकूण जागा : 19 काँग्रेस : 14 भाजप : 5 नगराध्यक्ष : नीलम येडगे (काँग्रेस)