Satara Bank Election : सातारा जिल्हा बँक निवडणुकीत धक्कादायक निकालाची मालिका सुरु आहे. आजी-माजी मंत्र्यांना पराभवाचा धक्का बसलाय. त्याशिवाय तुरुंगातून निवडणूक लढवणारे माजी आमदार प्रभाकर घार्गे यांचा विजय झालाय. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातून बंडखोरी करत घार्गे यांनी अर्ज सादर केला होता. तरुंगातून निवडणूक लढवत प्रभाकर घार्गे यांनी विजय मिळवलाय. प्रभाकर घार्गे यांचा 10 मतांनी विजय झालाय. या सातारा जिल्हा बँक निवडणुकीत शशीकांत शिंदे आणि शंभूराज देसाई यांना पराभवाचा धक्का बसलाय.
खून प्रकरणात न्यायालयीन कोठडीत असलेले राष्ट्रवादीचे प्रभाकर घार्गे यांनी बंडखोरी करत जिल्हा बँकेत फॉर्म भरला होता. तुरुंगात असताना प्रभाकर घार्गे निवडून आले. अजित पवार आणि गायत्रीदेवी यांचे निकटवर्तीय समजले जाणारे नंदकुमार मोरे यांचा घार्गे यांनी पराभव केला. नंदकुमार मोरेंना 46 मते तर प्रभाकर घार्गे 56 मते मिळाली आहे. प्रभाकर घार्गे यांचा 10 मतांनी विजय झालाय. सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेतील 21 पैकी 11 उमेदवार बिनविरोध झाल्यामुळे 10 जागांसाठी निवडणूक पार पडली होती. सातारा जिल्ह्यातील 11 तालुक्यात 1964 मतदारांपैकी 1892 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. एकूण 96.33 टक्के मतदान झाले. सर्वाधिक मतदान जावळी आणि खटाव सोसायटीसाठी झाले.
काय आहे प्रकरण?
खटाव तालुक्यातील पडळ साखर कारखान्यामध्ये कर्मचाऱ्याने साखरेचा पोत्यांची अफरातफर केली या आरोपातून कर्मचाऱ्याला दोन दिवस कारखान्यातच बेदम मारहाण केली होती. या मारहाणीत कर्मचाऱ्याचा मृत्यू झाला. नातेवाईकांनी दिलेल्या तक्रारीनंतर कारखान्याचे प्रमुख माजी आमदार प्रभाकर देशमुख यांच्यासह इतरांवर कराड शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकऱणी प्रभाकर घार्गे यांना अटक करण्यात आली आहे.
प्रभाकर घार्गे कोण आहेत?
राष्ट्रवादी काँग्रेसकडून प्रभाकर घार्गे हे विधानपरिषदेचे सातारा-सांगली स्थानिक स्वराज संस्था मतदारसंघाचे आमदार राहिले आहेत. सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालकपदही सांभाळलं खटाव माण साखर कारखान्याचे ते चेअरमन आहेत.
देसाई-शिंदे यांचा पराभव -
गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांना पराभवाचा धक्का बसला आहे. सत्यजित पाटणकर यांनी शंभूराज देसाई यांचा पराभव केला. मिळालेल्या माहितीनुसार, सत्यजितसिंह पाटणकर यांचा 14 मतांनी विजय झालाय. गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांना 44 मते मिळाली तर सत्यजितसिंह पाटणकर यांना 58 मते मिळाली आहेत. शंभूराज देसाई यांचा पराभव शिवसेनेसाठी मोठा धक्का मानला जात आहे. शिसेनेसह राष्ट्रवादीलाही सातारा दिल्हा बँक निवडणुकीत मोठा धक्का बसलाय. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि माजी मंत्री शशिकांत शिंदे यांचा अवघ्या एका मतानं पराभव झाला आहे. शिंदेंविरोधात उभे असलेले राष्ट्रवादीचे बंडखोर ज्ञानदेव रांजणे यांचा विजय झाला आहे. शशिकांत शिंदे यांना 24 मतं मिळाली असून विजयी उमेदवार ज्ञानदेव रांजणे यांना 25 मतं मिळाली आहेत. शशिकांत शिंदे यांचा पराभव हा राष्ट्रवादीसाठी मोठा धक्का समजला जात आहे. कराड सोसायटी गटात सहकारमंत्री बाळासाहेब पाटील यांचा विजय झालाय. सहकारमंत्री बाळासाहेब पाटील यांना 74 तर उदयसिंह पाटील यांना 66 मते मिळाली.
या जागा बिनविरोध -
सातारा जिल्हा बँक निवडणुकीत 11 जागा बिनविरोध झाल्या. रामराजे नाईक निंबाळकर, खासदार उदयनराजे भोसले, आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले, दत्तानाना ढमाळ, नितीन पाटील, अनिल देसाई, सुरेश बापू सावंत, लहुराज जाधव, आमदार मकरंद पाटील, राजेंद्र राजपुरे आणि शिवरुपराजे खर्डेकर यांचा समावेश आहे.
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोड पाहा लाईव्ह - ABP Majha