Ravikant Tupkar : कापूस आणि सोयाबीनप्रश्नी सलग 4 दिवस अन्नत्याग आंदोलन करुन राज्याचं लक्ष वेधून घेतलेल्या स्वाभिमानीचे नेते रविकांत तुपकर (Ravikant Tupkar) यांच्या कारचा अपघात झाला आहे. बुलढाण्याहून मुंबईकडे जात असताना तुपकरांच्या वाहनाला भरधाव वेगातील दुचाकीस्वारांनी धडक दिली. या दुर्घटनेत दुचाकीवरील दोन्ही तरुण जखमी झाले असून तुपकरांनीच त्यांना औरंगाबादेतील रुग्णालयात उपचारासाठी दाखल केलं आहे.  उपमुख्यमंत्र्यांसोबतच्या नियोजित बैठकीसाठी रविकांत तुपकर मुंबईकडे निघाले असताना मध्यरात्री 12 वाजता चिखलीजवळच्या बेराळा फाट्यानजीक अपघात झाला.  


स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर यांच्या अन्नत्याग आंदोलन राज्य सरकारकडून उपमुख्यमंत्री अजित पवार आणि पालकमंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे यांनी तर केंद्र सरकारकडून देवेंद्र फडणवीस यांच्या आश्वासनानंतर स्थगित करण्यात आलं होतं. स्वतः रविकांत तुपकर यांनी आंदोलन स्थगित करत असल्याची घोषणा केली होती. दरम्यान, सोयाबीन आणि कापसाला भाव मिळावा यासाठी रविकांत तुपकर यांचं गेल्या चार दिवसांपासून अन्नत्याग आंदोलन सुरु होतं. तुपकरांची तब्येत ढासळत असल्यानं कार्यकर्त्यांची चिंता वाढू लागली होती. त्यामुळे कार्यकर्ते आक्रमक झाल्याचंही पाहायला मिळालं होतं. अशातच तुपकरांच्या अन्नत्याग आंदोलनाला हिंसक वळणही लागलं होतं. 


आंदोलनाला हिंसक वळण


रविकांत तुपकर यांनी सुरु केलेल्या अन्नत्याग आंदोलनाला हिंसक वळण लागलं होतं. अन्नत्याग आंदोलनामुळे काल तुपकर यांची प्रकृती खालावली होती. त्यामुळे आक्रमक झालेल्या स्वाभिमानीच्या कार्यकर्त्यांनी रास्ता रोको करत तुपकरांच्या आंदोलनाला पाठिंबा दिला होता. प्रशासनाकडून कोणत्याही प्रतिसाद न मिळाल्याने कार्यकर्ते आक्रमक झाले होते. एका संतप्त कार्यकर्त्याने अंगावर पेट्रोल ओतून घेत आत्मदहनाचा प्रयत्न केला होता. यानंतर हे आंदोलन आणखी चिघळलं. स्वाभिमानीच्या कार्यकर्त्यांनी मलकापूर-औरंगाबाद राज्य महामार्गावर रास्ता रोको करत जोरदार घोषणाबाजी केली होती. पोलिसांच्या गाडीच्या काचाही यावेळी फोडण्यात आल्या. यानंतर तुपकरांच्या घराबाहेर पोलीस बंदोबस्त वाढवला होता. 


17 नोव्हेंबर पासून सुरु असलेल्या अन्नत्याग आंदोलनाला शुक्रवारी संपूर्ण विदर्भातील शेतकऱ्यांनी उस्फुर्त प्रतिसाद दिला होता. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर यांनी सुरु केलेल्या अन्नत्याग आंदोलनाच्या चौथ्या दिवशी ठिकठिकाणी मोठ्या प्रमाणात रास्तारोको करण्यात आला होता. दरम्यान प्रशासनाकडून कोणताही प्रतिसाद नसल्यानं कार्यकर्ते आणि शेतकरी आक्रमक झाले होते. आंदोलनस्थळी तुपकरांच्या निवासस्थानाबाहेर एका संतप्त कार्यकर्त्यानं आपल्या अंगावर पेट्रोल घेऊन आत्मदहनाचा प्रयत्न केला आणि एकच गदारोळ उडाला. पोलिसांनी कार्यकर्त्यांना अडवण्याचा प्रयत्न केला होता. मात्र परिस्थिती हाताबाहेर गेली आणि मलकापूर औरंगाबाद राज्य महामार्गावर रास्तारोको करत जोरदार घोषणाबाजी झाली. 


दरम्यान, पोलिसांच्या गाडीच्या काचा देखील फोडण्यात आल्या होत्या. तारांबळ उडालेल्या प्रशासनानं सर्व परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी अतोनात प्रयत्न केले, शेवटी काही कालावधीनंतर प्रकरण निवळलं. परंतु सद्यस्थितीत तुपकरांच्या घराबाहेर मोठा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला असून येणाऱ्या जाणाऱ्या प्रत्येकाची कसून चौकशी करण्यात येत आहे. शेतकऱ्यांना पाठिंबा देण्यासाठी मोठ्या संख्येने तुपकरांच्या घरासमोर जमले होते. दरम्यान, आता आंदोलन स्थगित करण्यात आलं असून पालकमंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे आणि विरोधी पक्षनेते  देवेंद्र फडणवीस यांच्या आश्वासनानंतर रविकांत तुपकर यांनी स्वतः आंदोलन स्थगित करत असल्याची घोषणा केली.