सातारा: साताऱ्यातल्या वाईमधील हत्याकांडाप्रकरणी आरोपी संतोष पोळनं आणखी एक धक्कादायक खुलासा केला आहे. आता त्यानं सातवा खून केल्याची पोलिसांकडे कबुली दिली आहे. त्यामुळे या प्रकरणातील गूढ दिवसेंदिवस वाढत आहे.

 

घोटवडेकर रुग्णालयातील वॉर्डबॉय तुषार जाधवच्या खून केल्याची आता संतोष पोळनं कबुली दिली आहे. याच रुग्णालयात संतोष पोळ हा अतिदक्षता विभागात होता.

 

इंजेक्शन देऊन वॉर्डबॉय तुषार जाधव याची हत्या केल्याची माहिती संतोष पोळनं पोलिसांनी दिली त्यानंतर रुग्णवाहिकेतून सातारा जिल्हा रुग्णालयात नेत असतानाच तुषार जाधवचा मृत्यू झाला होता. मात्र, हा खून त्यानं नेमका का केला याबाबत कोणतीही माहिती अद्याप समजू शकलेली नाही. तसेच पोळनं अजून किती जणांचे जीव घेतले आहेत याबाबतही प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे.

 

घोटवडेकर रुग्णालयाचा काही भाग सील

 

दरम्यान. सात हत्या करणारा संतोष पोळ ज्या हॉस्पिटलमध्ये कर्मचारी म्हणून काम करत होता तिथ पोलिसांनी छापा टाकला. वाईमधील डॉक्टर विद्याधर घोटवडेकरांच्या हॉस्पिटलमध्ये हा छापा टाकण्यात आला. यावेळी वाई पोलिसांनी डॉ विद्याधर घोटवडेकर यांचा रुग्णालयाचा काही भाग आणि दवाखान्याचे मेडिकल सील करण्यात आलं.

 

डॉ. संतोष पोळ हा घोटवडेकर हॉस्पिटलच्या अतिदक्षता विभागात गेल्या 8 वर्षापासून काम करत होता. त्यामुळे याप्रकरणी काही नवी माहिती मिळते का हे पाहणं महत्त्वाचं आहे.

 

कसा सापडला संतोष पोळ?

 

13 वर्षात 7 खून पडले, तरीही डॉ. संतोष पोळ मोकाट होता. मात्र डॉ. पोळचे दिवस भरले तेच अंगणवाडी सेविका संघटनेच्या राज्याध्यक्ष मंगल जेधे गायब झाल्या त्या दिवशी. 16 जून 2016 ला मंगल जेधे घरी परतल्या नाहीत, त्यामुळे कुटुंबानं पोलिसात तक्रार दिली आणि हाती लागला सर्वात मोठा पुरावा. अर्थात संतोष पोळची मैत्रीण आणि साथीदार ज्योती मांढरे.

 

कसं झालं हत्यांचं प्लॅनिंग ?
संतोष पोळ अतिशय थंड डोक्यानं हत्येचं प्लॅनिंग करायचा. दोन दोन महिने महिलांच्या मागावर असायचा. संतोषचा कबुलीजबाब ऐकून अंगाचा थरकाप उडल्याशिवाय राहात नाही. हत्येच्या दोन महिने आधीच तो मोठे खड्डे खणायचा अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.

 

13 वर्ष.. सात हत्या.. डॉ. पोळच्या कृष्णकृत्याने साताऱ्यात थरकाप

 

13 वर्षात संतोषशी संबंध आलेल्या 5 महिला बेपत्ता झाल्या. पोलिसात तशा तक्रारी आल्या. पण तपास लाल फितीत अडकल्यानं संतोष पोळ मोकाट होता. पोलिसांच्या दाव्यानुसार हत्यांमध्ये फक्त आणि फक्त आर्थिक देवाणघेवाणीचाच संबंध आहे. त्यामुळे 5 हत्यांशिवाय संतोषनं आणखी काही लोकांचाही गळा घोटलाय का? याचाही तपास सुरु आहे.

 

स्वत:ला डॉक्टर म्हणवणाऱ्या संतोषचा कारभार सुरुवातीला एका पडक्या घरातून चालायचा. माती आणि पत्र्याचं घर. धोमचा परिसर थोडा आडवळणाचा, त्यामुळं कुणी आजारी पडलं तर आजूबाजूच्या गावांमधील लोकांना संतोष पोळचाच आधार होता आणि त्याचाच फायदा संतोष घ्यायचा.

 

महिलांना एड्सची भीती दाखवून शोषण
महिलांना गुप्तरोग आणि एड्स झाल्याची भीती दाखवून त्यांचं आर्थिक शोषण सुरु करायचा. अर्थातच भीतीचं भांडवलं. डॉक्टरकीच्या नावाखालीच संतोष पोळची सामाजिक आणि राजकीय क्षेत्रातही उठबस होती. त्यामुळे गावातलं कुणीही संतोषविरोधात बोलायचं धाडस करत नव्हतं. अगदी संतोषच्या वागण्याबोलण्यात संशय जाणवल्यावर सुद्धाही.

 

मंगल जेधे खून प्रकरणः आतापर्यंत 7 खून केल्याची आरोपीची कबुली

 

थंड डोक्याचा आणि क्रूर मानसिकतेच्या संतोषचं धाडस इतकं की त्यानं अगदी घराच्या बाजूलाच एक मृतदेह पुरला होता. संतोषच्या डॉक्टरकीच्या डिग्र्या किती खऱ्या आहेत, याचाही शोध पोलिसांनी सुरु केला आहे. पण महिलांना मृत्यूचा घाट दाखवण्यासाठी त्यानं भूल देण्यासाठी वापरलं जाणारं औषधच हत्यार म्हणून वापरलं.
दिल्ली निठारी हत्याकांडानं गोठून गेली होती, आता साताराही हादरला आहे. त्यामुळे सावध राहा आणि बेसावधपणे कुणावरही विश्वास ठेऊ नका.


 

संबंधित बातम्या


डॉ. संतोष पोळचा आणखी एक धक्कादायक खुलासा


मंगल जेधे खून प्रकरणः आतापर्यंत 6 खून केल्याची आरोपीची कबुली


13 वर्ष.. सहा हत्या.. डॉ. पोळच्या कृष्णकृत्याने साताऱ्यात थरकाप