Santosh Deshmukh Case : बीड येथील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख (Santosh Deshmukh) यांचे हत्या प्रकरण चांगलेच चर्चेत आले आहेत. या प्रकरणात मंत्री धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांचे निकटवर्तीय असलेले वाल्मिक कराड (Walmik Karad) हे मास्टरमाइंड असल्याचा आरोप केला जात आहे. राज्यात ठिकठिकाणी या घटनेचा निषेध व्यक्त केला जात आहे. शनिवारी (दि. 28) बीडमध्ये संतोष देशमुख यांच्या हत्येच्या निषेधार्थ सर्वपक्षीय मूक मोर्चा काढण्यात आला होता. आता राज्यभरातील ग्रामपंचायतीचे कामकाज आजपासून तीन दिवस बंद राहणार आहे.
मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या निर्घृण हत्येप्रकरणी आरोपींवर कठोर कारवाई करावी आणि लोकप्रतिनिधींवर होणाऱ्या हल्ल्यांना आळा बसावा, यासाठी कडक निर्बंध बसवावेत, या मागणीला घेऊन आजपासून सरपंच संघटनेनं राज्यभरात काम बंद आंदोलन पुकारलं आहे. या आंदोलनात महाराष्ट्रात एकूण 27,951 ग्रामपंचायती सहभागी होत आहेत.
भंडारा जिल्ह्यातील 541 ग्रामपंचायतींचाही सहभाग
ग्रामपंचायत हा पंचायत राजमधील सर्वात खालचा पण महत्त्वाचा भाग आहे. महाराष्ट्रात 351 पंचायत समित्या किंवा ब्लॉक पंचायती आहेत. भंडारा जिल्ह्याच्या कार्यक्षेत्रात एकूण 7 पंचायत समित्या असून 541 ग्रामपंचायती आणि 866 गावे आहेत. ग्रामपंचायतीचे कामकाज पुढील तीन दिवस ठप्प होणार असून याचा फटका नागरिकांना बसण्याची शक्यता नाकारता येत नाही.
सांगली, सातारा, कोल्हापुरातील संघटना सहभागी नाहीत
दरम्यान, सरपंच संतोष देशमुख हत्येच्या निषेधार्थ सरपंच संघटनांच्या आंदोलनात सांगली, सातारा, कोल्हापूरातील संघटना सहभागी होणार नाहीत. राज्यात सरपंचांच्या तीन वेगवेगळ्या संघटना आहेत. तर 9 तारखेला सांगली, सातारा, कोल्हापूर या तीन जिल्ह्यातील संघटनेने बंद पुकारला आहे.
सरपंच संघटनेची नेमकी मागणी काय?
बीड जिल्ह्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांची अपहरण करून त्यांची हत्या करण्यात आली. ही घटना ताजी असतानाच धाराशिव जिल्ह्यातील सरपंचाच्या कारची तोडफोड करून पेट्रोलने जिवंत जाळण्याचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना समोर आली. यावरून सरपंच संघटना आक्रमक झाली आहे. राज्यात अशा घटना घडणे हे अतिशय चिंताजनक असून सरपंचांनी गावगाडा चालवायचा कसा? त्यांच्या सुरक्षेची हमी घ्यायची कुणी? असा सवाल करत अशा घटनावर आळा घालण्यासाठी शासनाने कठोर पावले उचलावीत. सरपंच सुरक्षेसाठी कायदा करावा, हत्या प्रकरणातील आरोपींना तातडीने अटक करून त्या मागच्या मास्टर माईंडचा शोध घेण्यात यावा. सरपंच तथा ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांना कायदेशीर संरक्षण देण्यात यावे, अशी सरपंच संघटनेची मागणी आहे. महाराष्ट्र प्रदेश सरपंच संघटनेतर्फे राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निवेदनही देण्यात आले आहे.
आणखी वाचा
Santosh Deshmukh Case : वाल्मिक कराडसोबतचे ते पोलीस कोण? बीडचे पोलीस अधीक्षक म्हणाले, 'माहिती घेतो'