नवी दिल्ली : प्राईम पॉईंट फाऊंडेशन आणि आयआयटी चेन्नई यांच्यातर्फे दिल्या जाणाऱ्या नवव्या संसदरत्न पुरस्कारांचं उद्या चेन्नईत वितरण होणार आहे. एकूण सात खासदारांना या पुरस्काराने गौरवण्यात येणार आहे, त्यापैकी पाच खासदार हे महाराष्ट्रातील आहेत.
राष्ट्रवादी काँग्रेसच्या बारामतीच्या खासदार सुप्रिया सुळे, काँग्रेसचे हिंगोलीचे खासदार राजीव सातव, शिवसेनेचे मावळचे खासदार श्रीरंग बारणे, राष्ट्रवादी काँग्रेसचे कोल्हापूरचे खासदार धनंजय महाडिक आणि भाजपच्या नंदुरबारच्या खासदार हिना गावित यांचा यामध्ये समावेश आहे.
याआधीच्या अनेक रिपोर्टमध्येही महाराष्ट्रातील खासदारांचा परफॉर्मन्स चांगला दाखवण्यात आला आहे. या खासदारांची हजेरी, चर्चांमधला सहभाग, प्रश्नसंख्या, खासगी विधेयकं इत्यादी माहिती यांच्या आधारे खासदारांची निवड केली जाते.
माजी राष्ट्रपती एपीजे अब्दुल कलाम यांच्या सल्ल्यानुसार फाऊंडेशनने हे संसदरत्न पुरस्कार सुरु केले होते.
विशेष म्हणजे लोकसभेतील एकूण सहा खासदारांना हा पुरस्कार देण्यात येणार आहे, ज्यापैकी पाच खासदार महाराष्ट्राचे आहेत, तर बीजेडीचे ओदिशामधील एका खासदारालाही हा पुरस्कार मिळणार आहे.
महाराष्ट्रातल्या खासदारांची कामगिरी
सुप्रिया सुळे : 74 चर्चांमध्ये सहभाग, 16 खासगी विधेयकं, 983 प्रश्न उपस्थित आणि 98 टक्के उपस्थिती.
श्रीरंग बारणे : 102 चर्चांमध्ये सहभाग, 16 खासगी विधेयकं, 932 प्रश्न उपस्थित आणि 94 टक्के हजेरी.
राजीव सातव : 97 चर्चांमध्ये सहभाग, 15 खासगी विधेयकं, 919 प्रश्न उपस्थित आणि 81 टक्के हजेरी.
धनंजय महाडिक : 40 चर्चांमध्ये सहभाग, एक खासगी विधेयक, 970 प्रश्न आणि 74 टक्के हजेरी.
हिना गावित : 151 चर्चांमध्ये सहभाग, 21 खासगी विधेयकं, 461 प्रश्न आणि 82 टक्के हजेरी.
'संसदरत्न'च्या यादीत सातपैकी पाच खासदार महाराष्ट्राचे
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
08 Jun 2018 09:06 PM (IST)
नवव्या संसदरत्न पुरस्कारांचं उद्या चेन्नईत वितरण होणार आहे. एकूण सात खासदारांना या पुरस्काराने गौरवण्यात येणार आहे, त्यापैकी पाच खासदार हे महाराष्ट्रातील आहेत.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -