बीड : न्यायालयीन प्रक्रियेमुळे 24 मेपासून उस्मानाबाद-बीड-लातूर विधान परिषद निवडणुकीची मतमोजणी लांबणीवर पडली. याच प्रकरणातील निर्णय आता सोमवारी म्हणजे 11 तारखेला लागणार असल्याचं हायकोर्टाच्या औरंगाबाद खंडपीठाने सांगितलं.

दरम्यान, यापूर्वीच निवडणूक आयोगाने 11 तारखेपर्यंत ही निवडणूक प्रक्रिया पूर्ण करा, असे निर्देश दिले होते. असं असताना कोर्टाचा जो काही निर्णय येणार आहे, तोही 11 तारखेला येणार आहे. म्हणून आता ही मतमोजणीची प्रक्रिया 11 तारखेलाच म्हणजे निर्णयानंतर लगेच होणार, की त्यापुढे परत एकदा निवडणूक आयोग आपला प्रोग्राम बदलून देणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे.

निकाल कशामुळे लांबणीवर?

बीड नगरपालिकेच्या दहा नगरसेवकांना अपात्र केल्यानंतर त्यांनी न्यायालयामध्ये दाद मागितली. त्यानंतर त्यांना मताचा अधिकारही मिळाला. मात्र त्यांचं मत हे बाजूला ठेवण्यात आल्याने परत ते नगरसेवक कोर्टामध्ये गेले आणि त्यामुळेच ही मतमोजणीची प्रक्रिया लांबणीवर पडली. कारण, त्या नगरसेवकांचं म्हणणं होतं, की आमचं मतदान बाजूला ठेवून मोजलं गेलं तर गोपनीयतेचा भंग होईल.

येत्या 12 तारखेपर्यंत विधान परिषद सदस्यांची मुदत आहे. म्हणजे पहिल्या आमदाराचा कालावधी 12 तारखेला संपत असताना नेमकं मतमोजणी लांबणीवर पडल्याने काही कायदेशीर पेच निर्माण झाला आहे.

राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांमधून निवडून येणाऱ्या सहा जागांसाठी 21 मे रोजी निवडणूक झाली. 24 मे रोजी सर्व निकाल जाहीर करण्यात आले. मात्र,  बीड-उस्मानाबाद-लातूरची मतमोजणीच झाली नाही. कारण, याबाबत हायकोर्टाच्या औरंगाबाद खंडपीठात विविध याचिका दाखल झाल्या आहेत.

बीडमध्ये प्रतिष्ठेची लढत

लातूर-उस्मानाबाद-बीडच्या जागेसाठीची निवडणूक सर्वात चुरशीची मानली जात आहे. कारण ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे आणि विधानपरिषेदेचे विरोधी पक्ष नेते धनंजय मुंडे यांनी ही निवडणूक आपल्या प्रतिष्ठेची केली आहे.

या मतदारसंघात भाजपचे सुरेश धस आणि राष्ट्रवादीने पाठिंबा दिलेले अपक्ष उमेदवार अशोक जगदाळे यांच्यात लढत होत आहे.

राष्ट्रवादीने रमेश कराड यांना उमेदवारी दिली होती. मात्र त्यांनी ऐनवेळी अर्ज मागे घेतल्याने, राष्ट्रवादीची आणि पर्यायाने धनंजय मुंडेंची चांगलीच पंचाईत झाली.

त्यामुळे राष्ट्रवादीला ऐनवेळी बंडखोरी करत अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केलेल्या अशोक जगदाळे  यांना पाठिंबा द्यावा लागला.

संबंधित बातम्या :

विधानपरिषद निवडणुकीचं राज्यातलं चित्र, कुणाचं संख्याबळ किती?


उस्मानाबाद-बीड-लातूर विधानपरिषद : मतमोजणी पुढे ढकलली!


शंभर ते दीडशे मतांच्या फरकाने निवडून येणार : सुरेश धस


बीड-उस्मानाबाद-लातूरमध्ये एका मताची किंमत पाच लाख रुपये?


बीडच्या दहा निलंबित नगरसेवकांना मतदान करता येणार, पण...