मुंबई : पत्राचाळ घोटाळा (Patra Chawl Case) आणि मनी लाँड्रिंग प्रकरणी ईडीकडून शिवसेना नेते खासदार संजय राऊत (Sanjay Raut ) यांच्या पत्नी वर्षा राऊत (Varsha Raut) यांची चौकशी संपली आहे. वर्षा राऊत यांची चौकशी तब्बल नऊ तास सुरू होती. नऊ तासानंतर त्या ईडी कार्यालयाबाहेर आल्या आहेत.
शिवसेना खासदार संजय राऊत आणि त्यांच्या पत्नी वर्षा राऊत यांची समोरासमोर चौकशी झाली. मुंबईतील ईडी (ED) कार्यालयात या दोघांची चौकशी झाली आहे. ईडीला संजय राऊत यांच्या घरातून काही कागदपत्रे मिळाले होते. त्यासंदर्भात प्रश्न विचारण्यात आल्याची माहिती मिळाली आहे. तर प्रवीण राऊत यांच्याशी झालेले व्यवहारांची तुम्हाला माहिती होती का? तुमच्या खात्यात अनोळखी व्यक्तीकडून 1 कोटी 8 लाख रुपयांचे व्यवहार झालेत हा अनोळखी व्यक्ती कोण? अलिबागमधील जमीन खरेदी आणि दादरमधील गार्डन कोर्ट इमारतीतील फ्लॅट तुमच्या नावे खरेदी करण्यात आलाय ही खरेदी प्रक्रिया कशी पार पडली? हे प्रश्न विचारण्यात आल्याची शक्यता आहे.
वर्षा राऊत यांची यापूर्वीही चौकशी
पत्राचाळ घोटाळ्याप्रकरणी वर्षा राऊत यांना ईडीचं समन्स बजावलं आहे. यापूर्वी जानेवारी महिन्यात वर्षा राऊत चौकशीसाठी ईडी कार्यालयात हजर झाल्या होत्या. यावेळी ईडी अधिकाऱ्यांनी त्यांची जवळपास साडेतीन ते चार तास चौकशी केली होती. आता पुन्हा एकदा ईडीनं वर्षा राऊत यांना चौकशीसाठी समन्स बजावलं आहे.
वर्षा राऊत यांच्या नावे अलिबागमध्ये संपत्ती; कधी आणि कितीला खरेदी केली जमीन?
दरम्यान वर्षा राऊत यांच्या नावावर खरेदी केलेल्या अलिबागमधील मालमत्तेची माहिती एबीपी न्यूजला मिळाली आहे. संजय राऊत यांच्या पत्नी वर्षा राऊत आणि इतरांच्या नावे 10 ठिकाणी एकूण 36.86 चौरस मीटर जमीन खरेदी करण्यात आली आहे.