मुंबई : कर्नाटकचा प्रश्न केवळ एका राज्यापुरता मर्यादित नसून दोन राज्यांतील सीमाप्रश्न आहे. हे कर्नाटकच्या उपमुख्यमंत्र्यांना कळलं पाहिजे. त्यांनी थोडा इतिहास समजून घेतला पाहिजे, अंस संजय राऊत कर्नाटकच्या उपमुख्यमंत्र्यांना उद्देशून म्हणाले आहेत. तसेच आता महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदी ठाकरे आहेत, हे सुद्धा कर्नाटकच्या सरकारने आता विसरु नये, असंही संजय राऊत म्हणाले आहेत. दरम्यान, सुप्रीम कोर्टाचा अंतिम निकाल येईपर्यंत कर्नाटकव्याप्त वादग्रस्त केंद्रशासित प्रदेश म्हणून घोषित करा, अस म्हणत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कर्नाटक सरकारवर निशाणा साधला होता. यालाच प्रत्युत्तर म्हणून कर्नाटकचे उपमुख्यमंत्री लक्ष्मण सावडी यांनी कर्नाटकातील मराठी भाषिकांना मुंबई कर्नाटकात सामील करण्याची इच्छा आहे, असं म्हटलं.


संजय राऊत बोलताना म्हणाले की, "काल महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी जे सांगितलं. तेव्हा त्यांच्या बरोबर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार व अन्य नेते होते. कर्नाटकचा प्रश्न हा केवळ कर्नाटकचा नसून, हा दोन राज्यांमधील सीमा प्रश्न आहे. हे कर्नाटकच्या उपमुख्यमंत्र्यांना कळालं पाहिजे. त्यांनी थोडा इतिहास समजून घेतला पाहिजे." पुढे बोलताना संजय राऊत म्हणाले की, "मुंबई, महाराष्ट्रात जे आमचे कानडी बांधव राहतात, आम्ही त्यांच्यावर कुठलीही सक्ती केलेली नाही. त्यांना संपूर्ण स्वातंत्र्य आहे. इथं कानडी शाळा आम्ही चालवतो. आम्ही कानडी शाळांना अनुदान देतो. इथं अनेक कानडी संस्था देखील चालवल्या जातात. पण बेळगाव सारख्या भागात ही परिस्थिती आहे का? ही लढाई कशासाठी आहे? ही लढाई आपली भाषा आपली संस्कृती टिकवण्यासाठी आहे. आम्ही काय देशाच्या बाहेर जा असं कधी कुणाला म्हणत नाही."


कर्नाटकच्या उपमुख्यमंत्र्यांना उद्देशून संजय राऊत म्हणाले की, "कर्नाटकच्या उपमुख्यमंत्र्यांनी एकदा मुंबईत, महाराष्ट्रात यावं आणि त्यांच्या कानडी बांधवांशी चर्चा करावी. इथं ते उद्योग क्षेत्र, हॉटेल क्षेत्रात जे कामं करतात, हे सर्वजण आमचेच आहेत. उद्या त्यांच जर मतदान घेतलं इथं, तर ते देखील सांगतील की बेळगाव महाराष्ट्रातचं आलं पाहिजे."


महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदी ठाकरे आहेत, हे कर्नाटकच्या सरकारने विसरू नये : संजय राऊत


"अनेक वर्षांपासून कर्नाटकचे काही नेते अशाप्रकारचं राजकारण करत आहे. परंतु, कायद्याने काय व्हायचं ते होईलचं, पण आता महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदी ठाकरे आहेत, हे सुद्धा कर्नाटकच्या सरकारने आता विसरू नये. कालची बैठक ही निर्णायक बैठक होती, एवढचं मी सांगतो. या विषयावर ज्या पद्धतीनं पावलं टाकायला पाहिजेत, ती टाकायचला सुरुवात झालेली आहे. कुणी तिकडं काही बरळलं तरी इकडं आम्हाला फरक पडत नाही." असा इशारा देखील संजय राऊत यांनी कर्नाटक सरकारला यावेळी दिला आहे.


सरकारला शेतकऱ्यांना चिरडून टाकायचंय : संजय राऊत


शेतकऱ्यांच्या ट्रॅक्टर रॅली दरम्यान झालेल्या हिंसाचारा प्रकरणी बोलताना संजय राऊत म्हणाले की, "सरकारने एकप्रकारची दडपशाही सुरु केली आहे. लाल किल्ल्यावर जे शेतकरी घुसले असं म्हणतात, ते खरोखर शेतकरी होते की, कोणीतरी फूस लावली होती. सध्या जे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. भाजपाच्या नेत्यांसोबत, जे कोणी सिध्दू वैगरे कोणी आहेत. ते कोण आहेत? त्याचा तपास आधी करा. ते कुठे फरार आहेत?"


पुढे बोलताना संजय राऊत म्हणाले की, "पण सरकारला यापुढे शेतकऱ्यांना चिरडून टाकायचं आहे. दडपशाही करायची आहे. त्यातील कारस्थानाचा एक भाग म्हणून, आंदोलनात फूट पाडून त्यातील एक गड जो भाजपच्या नेतृत्त्वाखील आतमध्ये घुसला होता. ते लाल किल्ल्यावर गेले, त्यांनी हडकंप माजवला. यामध्ये जे चित्र निर्माण झालं. आंदोलनात फूट पडली, शेतकरी नेत्यांवर गुन्हे दाखल केले. शेतकऱ्यांना बघून घेऊ, अशी भाषा पोलिसांकडून सुरु आहे. ठिक आहे. करुन घ्या, अधिवेशन सुरु होतंय संसदेचं, पहिल्या दिवसापासून तुम्हाला उत्तरं द्यावी लागतील."


महत्त्वाच्या बातम्या : 


मुंबई कर्नाटकात सामील व्हावी ही मराठी भाषिकांची इच्छा; कर्नाटकच्या उपमुख्यमंत्र्याचं उद्धव ठाकरे यांना उत्तर