मुंबई :आजचा दिवस ऐतिहासीक आहे. 20 वर्षानंतर शिवसेनेचा मुख्यमंत्री होत आहे, ही अभिमानास्पद बाब आहे. उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली हे सरकार पाच वर्ष टिकेल, असे मत शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी व्यक्त केले. महिन्याभराच्या सत्तानाट्यानंतर अखेर राज्यात सरकार स्थापनेचा मार्ग मोकळा झाला आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे आज मुख्यमंत्री पदाची शपथ घेणार आहे, या पार्श्वभूमीवर संजय राऊत यांनी माध्यमांशी संवाद साधला.


राऊत म्हणाले, उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली सरकार बनू नये यासाठी राष्ट्रपतीवन ते राजभवन अशा सर्व पर्यायांचा वापर करण्यात आला. आमच्यावर कोणत्याही सरकारी एजन्सीचा वापर केला तरी काहीही फरक पडणार नाही. परंतु आता महिन्याभराच्या संघर्षानंतर आता हे सरकार स्थापन होणार आहे. समोर येणाऱ्या सर्व संकटांवर मात करून हे सरकार पाच वर्षांचा कार्यकाळ पूर्ण करेल. वेगवेगळ्या केंद्रीय तपास संस्था केंद्र सरकारच्या ताब्यात असतात. त्यांनी कितीही मागे लावला तरी आमच्या सरकारला काहीही फरक पडणार नाही. आम्ही कोणत्याही स्थितीत सुडाचे राजकारण करणार नसल्याचे उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केले आहे.

काल उद्धव ठाकरे यांचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी फोनवरून संभाषण झालं. त्यावेळी त्यांनी नव्या सरकारला शुभेच्छा दिल्या. तसंच महाराष्ट्राला सर्वतोपरी सहकार्य करण्याचं आश्वासन दिलं आहे, असं त्यांनी सांगितलं. यावेळी त्यांनी अजित पवार यांना कोणतं पद द्यायचं याचा निर्णय हा राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांचाच आहे. काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना या पक्षांमध्ये कोणताही विसंवाद नाही. वाद होताना दिसल्यास पक्षाचे ज्येष्ठ नेते यावर तोडगा काढतात. विधानसभेचं अध्यक्षपद काँग्रेसला तर उपाध्यक्षपद राष्ट्रवादी काँग्रेसला देण्याचा निर्णय बैठकीत घेण्यात आला आहे. विधानसभेचा अध्यक्ष हा सभागृहाचा असतो. त्याजागी कोणाची निवड करायची याचा निर्णय तीन पक्ष मिळून घेतील.