नवी दिल्ली : संसदेतील घुसखोरीनंतर (Security Breach in Lok Sabha)  शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत  (Sanjay Raut)  यांनी नव्या संसद भवनावर टीका केली आहे.  नवीन संसद भवन असुरक्षित असल्याची  प्रतिक्रिया खासदार संजय राऊतांनी दिली आहे. तसेच मला नव्या संसदेत जाताना बँक्वेट हॉलमध्ये जातोय असे वाटते, असेही राऊत म्हणाले. दिल्लीत माध्यमांशी बोलताना त्यांनी ही प्रतिक्रिया दिली आहे. 


संजय राऊत म्हणाले, नव्या संसद भवनाच्या निर्मितीनंतर आम्हाला कायम चिंता होती की इथे काहीतरी होईल. जुन्या संसद भवनाची सुरक्षा मजबूत होती. जुन्या संसदेला एक ऐतिहासिक वारसा होता.  नव्या संसदेत जाताना मला असं वाटतं की मी बँक्वेट हॉलमध्ये जातोय. संसदेत घुसखोरी केलेले तरूण बेरोजगारीने अस्वस्थ आहे. मात्र त्यांच्या दृष्टीनं ही घटना क्रांती असली, तरी हा अतिरेक आहे, आमचं कोणालाही समर्थन नाही.


अजित पवार भाजपचे उपमुख्यमंत्री : राऊत


पकोडे तळा मोदी सांगतात, पीएचडी करुन काय दिवे लावणार भाजपचे उपमुख्यमंत्री म्हणतात. काल घुसखोरी करणाऱ्यां पैकी एक तरुणी PhD झालेली आहेय  PhD करून काय होणार? असं म्हणणारे भाजपचे उपमुख्यमंत्री आहेत. अजित पवारांना मी भाजपचेच उपमुख्यमंत्री म्हणणार, असे राऊत म्हणाले.


सरकार तकलादू पायांवर उभं : संजय राऊत 


सरकारची आता वाचा गेली, सरकार मुकबधिर झाले आहे. सरकार फक्त प्रचार सभा घेण्यात मग्न, सरकार तकलादू पायांवर उभं आहे. सरकारला कळलं असेल जम्मू काश्मीरात दहशतवादी कसे घुसतात? सरकारकडे सुरक्षा व्यवस्था ठोस नाही. भावनिक राजकारण फक्त केलं जातंय. सुरक्षा व्यवस्था भेदून कोणी कुठेही घुसू शकतं. आमचं कुणाच्या वागण्याला समर्थन नाही. संसदेतलं कालचं कृत्य चुकीचंच अशा घटना घडल्या तर संसदेत काहीच सुरक्षीत राहणार नाही. सरकारने कारवाई केलेली आहे. अशाप्रकारे संसदेत घुसण्याचा मार्ग जर अतिरेक्यांना समजला तर त्याचे गंभीर परिणाम होऊ शकतात, असे संजय राऊत म्हणाले.  


सरकारकडून धार्मिक राजकारण केलं जातंय : संजय राऊत


राऊत म्हणाले,   बेरोजगारी, महागाई या विषयावर सरकार बोलायला तयार नाही. फक्त धार्मिक राजकारण केलं जातंय. धर्म, राममंदिर याच विषयावर तिन्ही राज्यात भाजपने निवडणुका जिंकल्या आहेत. तरुणांच्या भावनांचा उद्रेक झाल्याचं कालच्या संसदेतील घटनेतून कळतं.तीन राज्यांच्या विजयानंतरही बेरोजगारीसारखे प्रश्न आजही आहे. 


नेतृत्व बदल केला तर जनता स्वीकारते: राऊत


संजय राऊत म्हणाले, नेतृत्व बदल केला तर जनता स्वीकारते. भाजपने तीन राज्यात नवे चेहरे आणण्याचे साहस दाखवले आहे.  जनतेने त्याचं स्वागत केलं.