Sanjay Raut : भाजपामुळे राज्याची संस्कृती आणि संस्कार पूर्ण बिघडले आहेत. चिखलफेक करण्यासाठी भाजपने काही टोळ्या भाड्याने घेतल्या आहेत. महाराष्ट्राची संस्कृती लयाला जाताना दिसत असून त्याला जबाबदार पूर्णपणे देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis), अमित शाह (Amit Shah), नरेंद्र मोदी (Narendra Modi) आणि त्यांचा सध्याचा भारतीय जनता पक्ष आहे, अशी प्रतिक्रिया शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी चिपळूण येथे झालेल्या राड्यावरून दिली आहे.
संजय राऊत म्हणाले की, भाजपामुळे (BJP) राज्याची संस्कृती आणि संस्कार पूर्ण बिघडले आहेत. चिखलफेक करण्यासाठी भाजपने काही टोळ्या भाड्याने घेतल्या आहेत. पुरोगामी महाराष्ट्राला एक राजकीय संस्कृती होती. यशवंतराव चव्हाणांपासून ते आतापर्यंत त्या संस्कृतीवर नशेच्या, दारूच्या, अनैकतेच्या गुळण्या टाकण्याचे काम भाजपने काही भाडोत्री लोकांकडून सुरु केले आहे.
महाराष्ट्राची संस्कृती लयाला जातेय
आम्ही सुद्धा कठोर शब्दांचा वापर करतो. आमच्याकडून एखादा-दुसरा शब्द चुकीचाही जात असेल. मात्र ज्या पद्धतीने भाजपने जो दारूखाना सुरु केलाय. त्यावरून मला महाराष्ट्राची संस्कृती लयाला जाताना दिसत आहे. त्याला जबाबदार पूर्णपणे देवेंद्र फडणवीस, अमित शाह, नरेंद्र मोदी आणि त्यांचा सध्याचा भारतीय जनता पक्ष आहे, असे त्यांनी म्हटले आहे.
हा तर भाजपाचा गोरख धंदा
इलेक्टोरल बॉण्ड निकालावर संजय राऊत म्हणाले की, गौतम अडाणी आणि भारतीय जनता पक्ष वेगळे नाही. इलेक्टोरल बॉण्डचा जो विषय आहे त्याला सर्वोच्च न्यायालयाने फटकार दिली आहे. ज्यांनी इलेक्टोरल बॉण्ड विकत घेऊन भारतीय जनता पक्षाची तिजोरी भरली आहे त्यांची नावे जाहीर करा ही सूचना सर्वोच्च न्यायालयाने दिली आहे. त्यात अडाणींचे नाव सर्वात वर आहे. मला खात्री आहे अशा प्रकारचे ठेके उद्योगपतींना द्यायचे आणि त्या बदल्यात शेकडो कोटींचे इलेक्टोरल निवडणूक निधी म्हणून बॉण्ड घ्यायचे, हा भारतीय जनता पक्षाचा गोरख धंदा आहे.
काय करताय हिंदुत्वरक्षक मुख्यमंत्री?
त्यामुळे हजारो कोटी रुपये भाजपच्या तिजोरीत जमा आहेत. मिठा गराची जमीन अडाणींना, धारावी अडाणींना अख्खी मुंबई अडाणींना दिली आहे. मुंबईचे उद्या नाव बदलून अडाणीनगर केले तर 106 हुतात्मे ज्यांनी मुंबईसाठी हौतात्म्य दिले आहे. त्यांना स्वर्गात पुन्हा एकदा आत्महत्या करावी लागेल. काय करतात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे? हिंदुत्वरक्षक काय करताय कोल्हापुरात बसून, अख्खी मुंबई एका उद्योगपतीच्या घशात चालली आहे. आणि त्या मुंबईवरचा मराठी ठसा पुसला जातोय. हे सगळे चोर दिल्लीवाल्यांची पुसत बसले आहे. सुप्रीम कोर्टाने जो काल निकाल दिलेला आहे. तो भारतीय जनता पक्षाचा मुखवटा फाडणारा आहे. त्यात जे नावे जाहीर होतील ते बघाच, असेही त्यांनी म्हटले आहे.
आणखी वाचा
कुणबी नोंदीवाल्यांना नवं आरक्षण नाही, हे सांगणं चुकीचं - मनोज जरांगे