Sanjay Raut Press Conferance : भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी छत्रपती शिवाजी महाराजांबाबत केलेल्या वक्तव्यावर शिवसेना खासदार संजय राऊत यांनी टिप्पणी केली आहे. हिंदूंकडे हिंदू म्हणून मत मागणारा शिवसेना हा देशातील पहिला पक्ष आहे. तसेच हिंदूंची व्होट बँक देशात आहे, हे शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंनी पहिल्यांदा सिद्ध केलं, असं ते म्हणाले. तसेच आमचं हिंदुत्व हे केवळ मंदिरांपुरतं मर्यादित नाही, राजकारणापुरतं मर्यादित नाही, हे त्यापुढंच आहे, पलिकडचं आहे, असंही संजय राऊत म्हणाले आहेत. 


शिवसेना खासदार संजय राऊत म्हणाले की, "चंद्रकांत पाटील काय म्हणतात? त्यावर भूमिका ठरत नाही. छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदू व्होट बँक तयार केली की, नाही, ते मला माहीत नाही. पण, त्यांनी या देशात पहिलं हिंदवी स्वराज्य स्थापन केलं. छत्रपती शिवाजी महाराजांचाच विचार हा हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आणि त्यापूर्वी वीर सावरकर यांनी महाराष्ट्रात रुजवला. बाळासाहेब ठाकरे यांना हिंदूहृदयसम्राट ही उपाधी देशाच्या जनतेनं दिली. आणि बाळासाहेब ठाकरे हे देशातील एकमेव नेते आहेत, भाजप नेते प्रमोद महाजन म्हणाले होते की, त्यांना बाळासाहेबांनी सांगितलं होतं, ज्याप्रमाणे मी मराठी माणसाला मराठी म्हणून मत द्यायला लावलं, त्याप्रमाणे मी देशातील हिंदूंना हिंदू म्हणून मत द्यायला लावीन. हे बाळासाहेब ठाकरेंनी 1992 नंतर करुन दाखवलं." 


हिंदूंना हिंदू म्हणून मत मागणारा शिवसेना देशातला पहिला पक्ष : संजय राऊत 


पुढे बोलताना ते म्हणाले की, "पार्ल्यातील पोटनिवडणूकीत शिवसेना पहिल्यांदा हिंदुत्वाच्या मुद्द्यावर लढली. तेव्हा कोणाच्याही मनात हा विचार आला नव्हता की, हिंदू म्हणून आपण निवडणूक लढायला हवी आणि हिंदुत्त्वाच्या मुद्द्यावरुन शिवसेनेच्या आमदारांचं निलंबन झालं. हिंदुत्त्वाच्या मुद्द्यावर आम्ही निवडणूक लढलो, हिंदू म्हणून आम्ही मतं मागितली, त्यामुळे शिवसेनेचे दोन आमदार रमेश प्रभू, सुर्यकांत महाडिक आणि आणखी एक आमदार होते, त्यांचं निलंबन करण्यात आलं हिंदुत्त्वाच्या मुद्द्यावर निवडणूक लढल्यामुळं."


आमचं हिंदुत्व पळपुटं आणि शेपुट घालणारं नाही : संजय राऊत 


"मला वाट नाही की, महाराष्ट्रात किंवा देशात भाजपच्या कोणत्या आमदाराला किंवा खासदाराला हिंदू व्होट बँक या विषयावर निवडणूक गमवावी लागली. आम्ही लढलो, आम्ही जिंकलो. बाळासाहेब ठाकरेंनी हिंदूंना हिंदू म्हणून मतदान करायला लावलं. या देशात हिंदूंची व्होट बँक आहे, हा पहिला विचार बाळासाहेब ठाकरेंनी मांडला. कोणी कोणत्या भ्रमात आहेत, ते मला माहीत नाही. आपल्या देशातील जनता बाळासाहेबांचं योगदान कधी विसरणार नाही." पुढे बोलताना ते म्हणाले की, "आमचं हिंदुत्व पळपुटं आणि शेपुट घालणारं नाही. आम्ही ठामपणे उभे राहतो, आम्ही लढतो आणि विजय मिळवतो. आमचं हिंदुत्व राजकारणासाठी, निवडणुकांच्या सोयीसाठी नाही, मंदिरांपुरतं नाही, आमचं हिंदुत्त्व लोकांना अन्न, वस्त्र, निवारा मिळावा यासाठी आहे. बाळासाहेबांचं स्थान जनतेच्या मनात अढळ आहे. व्होट बँकेचं राजकारण कोणात करायचंय, त्यांना करु द्या. पण त्यांनी इतिहासाची पानं पुन्हा चाळली पाहिजेत."


पाहा व्हिडीओ : हिंदूंना हिंदू म्हणून मत मागणारा शिवसेना देशातला पहिला पक्ष 



काय म्हणाले चंद्रकात पाटील?


भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी मंगळवारी पुण्यातील भाजप कार्यालयात पत्रकार परिषदेला संबोधित केले. त्यावेळी त्यांनी उमेदवारांच्या निवडणूक तिकिटाबाबत भाष्य केले. तिकिट हे पक्षाचे असते. व्होट बँक पक्षाची असते. व्होटबँक ही वर्षानुवर्षे मेहनत घेऊन तयार केलेली असते. छत्रपती शिवाजी महाराजांनी ही हिंदुत्वाची व्होट बँक तयार केली. अलिकडच्या काळात ही व्होट बँक अटल बिहारी वाजपेयी, आडवाणी, मोदी यांनी त्यावर कळस चढवला असे वक्तव्य चंद्रकांत पाटील यांनी केले.


दरम्यान, काल (मंगळवारी) काँग्रेस नेत्या सोनिया गांधी यांच्या घरी महत्त्वाची बैठक झाली. त्या बैठकीला शिवसेनेच्या वतीनं संजय राऊत उपस्थित होते. या बैठकीत तृणमूल काँग्रेसच्या अध्यक्षा ममता बॅनर्जी यांच्याशी चर्चा करण्याची जबाबदारी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्याकडे देण्यात यावी, याबाबत चर्चा झाल्याची माहिती मिळत आहे. 


महत्त्वाच्या इतर बातम्या : 


चंद्रकांत पाटील यांचे अजब वक्तव्य, छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदू वोट बॅंक विकसित केली, वाजपेयी-मोदींकडून कळस!


मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह