Sanjay Raut On Sharad Pawar : शरद पवार (Sharad Pawar) यांनी उद्योजक गौतम अदानी (Gautam Adani) यांच्याबाबत वेगळी भूमिका घेतली म्हणून महाराष्ट्रात महाविकास आघाडीमध्ये (Maha Vikas Aghadi) फूट पडणार नाही, असं ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी स्पष्ट केलं. तसंच जेपीसीच्या मागणीवर विरोधक ठाम असल्याचंही राऊत यांनी सांगितलं. ते दिल्लीत माध्यमांशी बोलत होते.


"गौतम अदानी यांना जाणीवपूर्व लक्ष्य केलं जात आहे. जेपीसीची मागणी करणं योग्य नाही," असं वक्तव्य राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केलं होतं. शरद पवारांच्या वक्तव्यानंतर महाविकास आघाडीमध्ये मतभेद आहेत का असे प्रश्न उपस्थित करण्यात आले. यावर पवारांच्या वक्तव्यामुळे महाविकास आघाडीत मतभेद किंवा फूट नाही, असं संजय राऊत यांनी स्पष्ट सांगितलं. 


जेपीसीच्या मागणीवर विरोधक ठाम : संजय राऊत


संजय राऊत म्हणाले की, "काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांची स्वतंत्र भूमिका होती. पण विरोधकांची आघाडी तेव्हाही होती आणि आताही आहे. पवारांनी अदानींबाबत वेगळी भूमिका घेतली असेल, त्यांनी वेगळं मत मांडलं असेल तरी महाराष्ट्रात महाविकास आघाडीमध्ये फूट पडणार नाही, तडे जाणार नाहीत. पवारांनी अदानींनी क्लीन चिट दिलेली नाही तर चौकशीचे पर्याय त्यासंदर्भात मत व्यक्त केलं आहे. आम्ही जेपीसीचा आग्रह धरतोय. पवारांचं असं म्हणणं आहे की, जेपीसीमध्ये चेअरमन त्यांचा असतो, सदस्यांचं बहुमत त्यांचं असतं, त्यातून काय निष्पन्न होणार? एका विशिष्ट कालमर्यादेत न्यायालयीन चौकशी हा पर्याय त्यांनी सुचवला आहे." तुम्हाला जेपीसी हवी की न्यायालयीन चौकशी, या प्रश्नावर उत्तर देताना संजय राऊत म्हणाले की, "देशाच्या गुन्हेगारांना ज्या मार्गातून शिक्षा मिळेल, असे कोणतेही पर्याय आपल्याला चालू शकतात पण जेपीसीच्या मागणीवर विरोधक ठाम आहेत."


"उद्योग टिकायला पाहिजेत, वाढले पाहिजेत, उद्योगपती जगला पाहिजे, पण..."


"हिंडनबर्ग अहवालामुळे देशासह जगभरात खळबळ माजली. सत्य माहिती समोर आली. एलआयसी, स्टेट बँकेचे पैसे कशाप्रकारे भाजपने आपल्या जवळच्या उद्योजकांच्या खिशात घातले. लोकांना नवीन माहिती मिळाली. एक सरकार, संपूर्ण सत्ता एका उद्योगपतीसाठी देशाची प्रतिष्ठा कशी पणाला लावतंय हे समोर आहे. या देशात उद्योग टिकायला पाहिजेत, राहिले पाहिजेत, वाढले पाहिजेत, उद्योगपती जगला पाहिजे, मग अंबानी असो वा कोणीही असो. त्याकाळात टाटा, बिर्ला, बजाज यांनी देश घडवला. देशाची अर्थव्यवस्था वाढवली, उद्योजकांशिवाय देशाची अर्थव्यवस्था मजबूत होणार नाही, रोजगार मिळणार नाही, अर्थव्यवस्थेला गती आणि चालना मिळणार नाही. हे भूमिका सगळ्यांचीच आहे. याचा अर्थ असा नाही की या देशात केवळ एक किंवा दोनच उद्योगपती राहतील, आणि बाकी सगळ्यांचे कारभार बंद केले जातील. जे उद्योग करु इच्छितात ते आपल्या विचारांचे नाहीत विरोधी पक्षांच्या संपर्कात असतील तर त्यांच्यामागे ईडी, सीबीआयसारख्या यंत्रणा लावून  तुरुंगात टाकायचं हे धोरण असू नाही, त्याबाबत आमची भूमिक ठोस आणि स्पष्ट आहे," असंही संजय राऊत यांनी म्हटलं. 


संबंधित बातमी


Sharad Pawar : अदानी प्रकरणी JPCची गरज नाहीच, पण का? शरद पवारांचं उदाहरणासह स्पष्टीकरण