मुंबई : नरेंद्र मोदी हे सूर्य नसून तेजस्वी सूर्य आहेत, त्यांच्यामुळेच देशभर प्रकाश पडलाय, आम्ही जो श्वास घेतोय तोही मोदींमुळेच अशा शेलक्या शब्दात खासदार संजय राऊत यांनी भाजपचा समाचार घेतला. राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नरेंद्र मोदी हे सूर्य आहेत, त्यांच्यावर थुकाल तर ती थुंकी तुमच्याच तोंडावर पडेल अशी टीका संजय राऊतांवर केली होती. त्याला संजय राऊतांनी आज प्रत्युत्तर दिलं. 


काय म्हणाले होते देवेंद्र फडणवीस? 


गेल्या काही दिवसांपासून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर विरोधकांनी जोरदार हल्लाबोल केल्याचं दिसून येतंय. भाजपने काढलेल्या सावरकर यात्रेमध्ये बोलताना राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्याला उत्तर दिलं होतं. सूर्यावर थुंकाल तर ती थुंकी तुमच्या तोंडावर पडेल, सूर्यावर पडणार नाही, या बाजार बुनग्यांना, राऊतांना सांगतोय, तुमची थुंकी तुमच्याच चेहऱ्यावर पडतेय. 


या देशातील नद्या मोदींमुळेच वाहतायत... 


देवेंद्र फडणवीस यांनी केलेल्या टीकेचा समाचार घेताना खासदार संजय राऊत यांनी त्याला प्रत्युत्तर दिलं आहे. ते म्हणाले की, "नरेंद्र मोदी सूर्यच काय... तर तेजस्वी सूर्य आहेत. हा जो सर्व काही देशात प्रकाश पडला आहे तो मोदींमुळेच पडला आहे. संध्याकाळी शीतल चांदणं पडतं तेही मोदींमुळेच पडतंय. सगळं त्यांच्यामुळेच आहे. नद्या वाहतात, समुद्र उसळतोय हे मोदींमुळेच आहे. याबद्दल आमचं काही म्हणणं नाही. आम्ही जो श्वास घेतोय, ही हवा आहे, ती मोदींमुळेच. आम्ही त्याबद्दल काहीही बोलत नाही. आम्ही विचारतोय भ्रष्टाचाऱ्यांना संरक्षण का देताय. तुम्ही सर्वशक्तीमान सीबीआयला सांगताय की कुणालाही सोडू नका. जे आमदार तुमच्याकडे गेले आहेत, त्यांच्यावर झालेल्या भ्रष्टाचाराच्या आरोपांचं काय? यावर तुम्ही काहीच बोलत नाही." 





संजय राऊतांचे देवेंद फडणवीसांना पत्र 


दरम्यान, खासदार संजय राऊत यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना एक पत्र लिहिलं आहे. या पत्रातून  भ्रष्टाचार आणि शेतकऱ्यांची लूट थांबवण्याची विनंती राऊतांनी केली आहे. सरकारमधील बाजारबुणग्यांवर कारवाई कधी करणार? असा  सवाल देखील त्यांनी या वेळी उपस्थित केला आहे. संजय राऊत यांनी पत्रात आमदार राहुल कुल, दादा भुसे आणि किरीट सोमय्या  यांचा उल्लेख केल आहे. 


संजय राऊत आपल्या पत्रात म्हणाले की, भ्रष्टाचाऱ्यांविरोधात घेतलेल्या आपण घेतलेल्या भूमिकेबद्दल कौतुक करावे तेवढे कमीच आहे. सरकारमधील अनेकांच्या बेकायदेशीर प्रकरणाबाबत पुरावे सादर करण्यासाठी आपली भेट द्यावी. गेल्या चार महिन्यापासून मी प्रयत्न करत आहे. परंतु आपण भेट देण्यास टाळाटाळ करत आहे.