Sanjay Raut on Giriraj Singh: संरक्षण खात्यातील गुपिते शत्रू राष्ट्र असलेल्या पाकिस्तानला पुरवणाऱ्या लोकांना अटक झाली व त्यांचा संघाशी संबंध उघड झाला, तरी अशा 'नमक हरामांच्या' पाठीशी गिरीराजसारखे लोक उभे राहतात, याचे आश्चर्य वाटते, अशा शब्दात सामनातून भाजप नेते गिरीराज सिंह यांच्या वक्तव्याचा समाचार घेण्यात आला आहे. मोदींनी ट्रम्प यांनी दिलेल्या धमकीनंतर पाकिस्तानविरुद्ध युद्ध थांबवलं, याला कोणती नमक हरामी म्हणायची? अशी विचारणा सामनातून करण्यात आली आहे.
आम्हाला नमक हरामांची मते नकोत
सामनातून म्हटलं आहे की, भारतीय जनता पक्षाचे केंद्रीय मंत्री गिरीराज सिंह यांनी नेहमीप्रमाणेच मुस्लिम समुदायावर 'घाणेरड्या पद्धतीने' वक्तव्य केले आहे. गिरीराज सिंह यांची वक्तव्ये हिंदू-मुसलमानांत तेढ निर्माण करणारी असतात. बिहार निवडणुकीच्या प्रचारात गिरीराज सिंह म्हणाले होते की, 'आम्हाला नमक हरामांची मते नकोत.' (येथे 'आम्ही' म्हणजे भाजप). मुस्लिम नागरिक सरकारच्या सर्व योजनांचे लाभ घेतात, पण भाजपला मतदान करीत नाहीत, म्हणून ही 'नमक हरामी' आहे, असे त्यांचे म्हणणे आहे. गिरीराज सिंह यांचे हे विधान भारतीय संविधानाच्या विरोधात आहे, कारण सरकारच्या योजना देशातील सर्व जनतेसाठी असतात, विशिष्ट जात-धर्मासाठी नसतात, हे त्यांनी समजून घ्यावे. संपादकीयात विचारले आहे की, त्यांच्या मते सर्व मुसलमान 'नमक हराम' आहेत, तर त्यांच्यासाठी काही ठोस योजना त्यांच्याकडे आहे काय?
नमक हराम' म्हणणे हा भाजपवाल्यांचा छंद
संपादकीयमध्ये पुढे म्हटलं आहे की, मोदी मंत्रिमंडळातील एका मंत्र्याने (गिरीराज सिंह) देशातील 20 कोटी मुस्लिम नागरिकांना 'नमक हराम' म्हटले आहे. भारतात 20-22 कोटी मुसलमान आहेत आणि ते देशाचे अधिकृत नागरिक आहेत. मुसलमान समाज मोठ्या प्रमाणात देशाच्या स्वातंत्र्यलढ्यात उतरला आणि अनेक मुस्लिम क्रांतिकारक फासावर गेले. मुसलमानांना 'नमक हराम' म्हणणे हा भाजपवाल्यांचा छंद आहे. तालिबान्यांना बळ देणारे (मोदी सरकार) भारतातील मुसलमानांना 'नमक हराम' म्हणतात, असा टोला संपादकीयात लगावला आहे.
नरेंद्र मोदी आणि भाजपचे राजकारण
नरेंद्र मोदी अनेकांची शाळा घेतात, पण गिरीराज सिंह यांच्यासारख्यांची शाळा ते घेऊ शकत नाहीत. कारण मोदी यांनाच ही अशी धर्मांध आणि बेताल वक्तव्ये केलेली हवी आहेत. गोध्रा कांडातून ज्यांची राजकारणाची दौड सुरू झाली, त्यांच्याकडून दुसरी काय अपेक्षा करणार, असा सवाल मोदींना उद्देशून विचारला आहे. पंतप्रधान मोदी यांना त्यांच्या मंत्र्याने २० कोटी मुस्लिम नागरिकांना 'नमक हराम' म्हटले आहे, हे मान्य आहे काय? भाजपचे राजकारण हिंदू-मुसलमानांतील तेढ आणि वैर यावर अवलंबून आहे. त्यामुळे धार्मिक सलोखा व राष्ट्रीय एकात्मतेचे या लोकांना वावडे आहे.
केंद्र सरकारी योजनांचा पैसा हा जनतेच्या करातून
'ऑपरेशन सिंदूर' सुरू करूनही बदला पूर्ण होण्याआधीच प्रे. ट्रम्प यांनी व्यापार बंद करण्याची धमकी दिल्यामुळे मोदींनी पाकिस्तानविरुद्धचे युद्ध थांबवले, यास कोणत्या प्रकारची 'नमक हरामी' म्हणायची, असा प्रश्न गिरीराज सिंह यांना विचारण्यात आला आहे. केंद्र सरकारी योजनांचा पैसा हा जनतेच्या करातून आलेला पैसा आहे, तो भाजपच्या तिजोरीतला पैसा नाही. भाजप किंवा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने स्वातंत्र्यासाठी कोणताच लढा दिला नाही.
हिंदू एक नंबरचे 'नमक हराम' म्हणावे लागतील
पुढे म्हटले आहे की, ज्यांच्याविरोधात दहशतवादी म्हणून हंबरडा फोडला त्या अफगाण-तालिबान्यांसाठी दिल्लीत पायघड्या घालण्याचे काम काही दिवसांपूर्वी मोदी सरकारने केले. तालिबान्यांना बळ देणारे भारतातील मुसलमानांना 'नमक हराम' म्हणतात. मुस्लिम नागरिक सरकारी योजनांचे लाभ घेतात, पण भाजपला मतदान करीत नाहीत, म्हणून ते 'नमक हराम' आहेत, असे गिरीराज सिंह यांचे मत आहे. संपादकीयात या तर्काला आव्हान देताना विचारले आहे की, सर्व हिंदू भाजपला मतदान करतात, या भ्रमात गिरीराज सिंह आहेत काय?
प. बंगाल, केरळ, कर्नाटक, हिमाचल प्रदेश, तेलंगणा अशा राज्यांतील हिंदू लोकांनी भाजपला मतदान केले नाही. महाराष्ट्रात लोकसभा निवडणुकीत बहुसंख्य हिंदूंनी भाजपविरोधात मतदान केले. महाराष्ट्रातला शेतकरी (जो हिंदू आहे) भाजपच्या विरोधात आहेच. याच तर्कानुसार, हे सर्व हिंदू एक नंबरचे 'नमक हराम' म्हणावे लागतील, कारण ते केंद्र सरकारच्या योजनांचा लाभ घेतात व भाजपला मते देत नाहीत. सर्व हिंदूंना गिरीराज सिंह फासावर लटकवणार आहेत काय, असा उपरोधिक सवाल संपादकीयात विचारला आहे.
इतर महत्वाच्या बातम्या