दरम्यान, महायुतीत आमचं जे ठरलं आहे ती कमिटमेंट पूर्ण झाली तर त्यांच्या केंद्रीय नेतृत्वाने राज्यात येण्याची गरज नाही, असेही ते म्हणाले. राऊत म्हणाले की, राजकारणात सत्तासंघर्ष जसा बाहेर असतो तसाच पक्षांतर्गत देखील असतो. राजकारणात असा संघर्ष असतो. काँग्रेसमध्ये देखील असा संघर्ष होता. राज्यातील प्रमुख माणसाच्या अवतीभवती चार माणसं असतात, मात्र आज अशी माणसं दिसत नाहीत, असेही ते म्हणाले. चंद्रकांत पाटील, मुनगंटीवार हे युतीबाबत किंवा सरकारबाबत काही बोलू शकतात का? त्यांना काही अधिकार आहेत का?, असा टोलाही त्यांनी लगावला.
भाजपकडून सरकारी यंत्रणेचा वापर करून फोडाफोडीचे राजकारण : संजय राऊत
भाजपकडून सरकार स्थापनेच्या काही हालचाली दिसत नाहीत. भाजपने चेहरा दिला आहे मात्र तरीही मुख्यमंत्री सत्तास्थापनेसाठी हालचाल करताना दिसत नाही. भाजपकडे महाजानदेश आला आहे, आमच्याकडे जनादेश नाही. त्यामुळे त्यांनी सरकार स्थापन करावं. आम्ही दोघांनी मिळून निवडणूक लढली हे भाजप मान्य करत नाही. फडणवीसांनी बहुमत आहे तर सरकार स्थापन करावे. आमच्याकडे येऊन त्यांनी पाठिंब्याचे पत्र घेऊन जावे, असेही ते म्हणाले.
विधानसभा निवडणुकीआधी आम्ही यापुढे स्वबळावर लढू असे आमच्या पक्षप्रमुखांनी सांगितले होते. आम्ही 288 जागा लढण्याची तयारी केली होती. मात्र भाजपला असं वाटलं की शिवसेना सोबत नसेल तर आपण महाराष्ट्रात पराभूत होऊ. यामुळे युतीचा प्रस्ताव घेऊन अमित शाह स्वतः आले. यावेळी युती करण्यासाठी एक संधी घेण्याचे ठरले. मात्र तरीही आमच्या मनात शंकेची पाल चुकचुकत होती, असेही ते म्हणाले.
फार मस्तवालपणा, 'हम करे सो कायदा' चालत नाही महाराष्ट्रात चालत नाही. शिवसेनेसोबत जे चुकीचे वागले त्यांची अवस्था काय झाली हे समोर आहे, शिवसेनेसोबत वाईट वागलेल्यांचे चांगलं झालेलं नाही, असा इशारा देखील त्यांनी दिला.
दरम्यान 'हीच ती वेळ, आता नाहीतर कधी नाही' असे म्हणत शिवसेनेचाच मुख्यमंत्री होईल असेही ते म्हणाले. तरुणांनी नेतृत्व केलं पाहिजे असं म्हणत त्यांनी आदित्य ठाकरे यांच्या मुख्यमंत्रीपदाबाबत ते स्वत: सकारात्मक असल्याचे संकेत दिले. मात्र मुख्यमंत्री पदाबाबतचा निर्णय हा उद्धव ठाकरे हेच घेतील असेही त्यांनी सांगितले.