बेळगाव : शिवसेनेचे खासदार संजय राऊत दोन दिवसांच्या बेळगाव दौऱ्यावर आहेत. संजय राऊत यांच्या दौऱ्यामुळे बेळगावमध्ये तणावाचं वातावरण निर्माण झालं आहेत. कन्नड संघटनेच्या इशाऱ्याला आणि विरोधाला झुगारुन संजय राऊत बेळगावात दाखल झाले. खबरदारीचा उपाय म्हणून याठिकाणी मोठा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.


कर्नाटक नवनिर्माण सेनेसह इतर कन्नड संघटनांचा विरोध पाहता राऊत पोलीस बंदोबस्तात हॉटेलमध्ये पोहोचले. बेळगावमध्ये नाथ पै व्याख्यानमालेच्या उद्घाटनानंतर संजय राऊतांची प्रकट मुलाखत होणार आहे. यावेळी कन्नडिगांकडून मराठी भाषिकांवर होणाऱ्या दडपशाहीबद्दल संजय राऊत काय बोलणार याकडे महाराष्ट्रासह कर्नाटकचंही लक्ष असणार आहे. मुलखतीआधी माध्यमांशी बोलतांना बेळगावचा मुद्दा सर्वोच्च न्यायालयात आहे आणि सर्वोच्च न्यायालय जो निर्णय देईल, तो आम्हाला मान्य असेल असं संजय राऊत यांनी म्हटलं.


संजय राऊतांना रावणाची उपमा


कर्नाटकच्या स्वाभिमानाला धक्का लावू देणार नाही. कर्नाटक रायण्णा आणि चिन्नम्मा यांची कर्मभूमी आणि जन्मभूमी आहे. आम्ही शिवसेनेच्या संजय राऊत यांचा निषेध करतो. कर्नाटक नवनिर्माण सेनेकडून संजय राऊत यांना रावणाची उपमा दिली आहे. आग लावण्यासाठी संजय राऊत बेळगावात आले असल्याची कनसेच्या भीमाशंकर पाटील टीका त्यांनी केली आहे.