मुंबई : शिवसेनेचे प्रवक्ते संजय राऊत यांनी आज केलेल्या नव्या ट्वीटमुळे ते पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. गेल्या काही दिवसांपासून संजय राऊत वेगवेगळ्या कविंतांच्या माध्यमातून त्यांचे विचार मांडत आहेत, शिवसेनेची मुख्यमंत्रीपदाबाबतची मागणी लावून धरत आहेत. राऊत यांनी आज हिंदीतले प्रसिद्ध कवी दुष्यंत कुमार यांच्या कवितेचा आधार घेत एक ट्वीट केलं आहे. त्याद्वारे त्यांनी त्यांचं मत मांडलं आहे.


संजय राऊत यांनी ट्वीटमध्ये म्हटले आहे की, "सिर्फ हंगामा खड़ा करना मेरा मकसद नहीं, सारी कोशिश है कि ये सूरत बदलनी चाहिए। मेरे सीने में नहीं तो तेरे सीने में सही, हो कहीं भी आग, लेकिन आग जलनी चाहिए।" दुष्यंत कुमार यांच्या कवितेच्या या ओळी संजय राऊत यांच्या सध्याच्या प्रत्येक कृतीबद्दलचं वर्णन करत आहेत.

संजय राऊत दररोज पत्रकार परिषद घेतात. या पत्रकार परिषदेमध्ये ते भाजपवर टीका करतात, तसेच शिवसेनेची मुख्यमंत्रीपदाची मागणी लावून धरतात. यावरुन काही लोक राऊत यांना लक्ष्य करत आहेत. या टीकाकारांना राऊत यांनी या कवितेद्वारे उत्तर दिले आहे.

दररोज पत्रकार परिषद घेऊन, भाजपवर टीका करुन मला केवळ गोंधळ घालायचा नाही. माझा प्रयत्न केवळ मुख्यमंत्रीपदावरील व्यक्ती बदलण्यासाठी सुरु आहे. तिथे शिवसेनेचा मुख्यमंत्री नेमण्यासाठी हा खटाटोप आहे, यासाठी आपण सर्वांनी प्रयत्न करायला हवेत. असा संदेश राऊत या कवितेद्वारे देत असावेत.

विधानसभा निवडणुकीचा निकाल लागून 12 दिवस उलटले आहेत. महाराष्ट्रातील जनतेने शिवसेना-भाजप महायुतीच्या बाजूने कौल दिला आहे. परंतु अद्याप महाराष्ट्रात नव्या सरकारची स्थापना झालेली नाही. शिवसेना-भाजपमध्ये मंत्रीपदांवरून वाद सुरु आहेत. अशा परिस्थिती संजय राऊत दररोज शिवसेनेच्या बाजूने किल्ला लढवत आहेत.

दुष्यंत कुमार यांची संपूर्ण कविता

हो गई है पीर पर्वत-सी पिघलनी चाहिए,
इस हिमालय से कोई गंगा निकलनी चाहिए।

आज यह दीवार, परदों की तरह हिलने लगी,
शर्त लेकिन थी कि ये बुनियाद हिलनी चाहिए।

हर सड़क पर, हर गली में, हर नगर, हर गाँव में,
हाथ लहराते हुए हर लाश चलनी चाहिए।

सिर्फ हंगामा खड़ा करना मेरा मकसद नहीं,
सारी कोशिश है कि ये सूरत बदलनी चाहिए।

मेरे सीने में नहीं तो तेरे सीने में सही,
हो कहीं भी आग, लेकिन आग जलनी चाहिए।

दरम्यान, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने त्यांचे मुखपत्र 'तरुण भारत'द्वारे संजय राऊत यांच्यावर टीका सुरु केली आहे. तरुण भारतने टीका करताना म्हटले आहे की, शिवसेना नेहमी मराठीचा मुद्दा वापरते, परंतु त्यांचे प्रवक्ते दररोज ट्विटरवर हिंदी कविता शेअर करतात.

तरुण भारतच्या कालच्या (04 नोव्हेंबर) आग्रलेखामध्ये म्हटले होते की, अनेक प्रश्नांमध्ये आणखी एक प्रश्र्न महाराष्ट्राच्या मनात घोंगावतोय, तो मराठी बाण्याचा. आता याच 'विदुषका'ला रोज सकाळ झाली की हिंदी शेरोशायरी का आठवते? अलिकडे रोज सकाळी 'टिवटिव' करताना केवळ हिंदीचा वापर हा मूळ मराठी बाण्याचा शिवसैनिक नसलेला नेता करतो. 'अति तेथे माती', 'अति शहाणा त्याचा...रिकामा', 'अंगापेक्षा बोंगा मोठा' अशा अनेक मराठी म्हणी या महाराष्ट्राच्या तोंडावर आहेत. त्या यांना का आठवत नाही? की मराठी बाण्याचे निव्वळ सोंगच समजायचे? एका गोष्टीचे कौतुक केले पाहिजे की, कुठल्याही भाजपाच्या नेत्याने या बेताल विदुषकाला उत्तर देण्याची तसदीही घेतली नाही. कारण, त्यातून मनोरंजन होण्यापलिकडे काहीही होणार नाही. अशा शब्दांत तरुण भारतने संजय राऊत यांच्यावर आगपाखड केली आहे.

व्हिडीओ पाहा