यवतमाळ : चंद्रपूर राजुरा येथील RT वन या नरभक्षक वाघाला जेरबंद करण्यासाठी वन कर्मचाऱ्याला पिंजऱ्यात ठेवण्याचा जो प्रकार झाला त्याची चुकीची माहिती समोर आली असल्याचं वनमंत्री संजय राठोड यांनी स्पष्ट केलं. नरभक्षक वाघाला जेरबंद करण्यासाठी एका पिंजऱ्यात बकरी किंवा त्याचं भक्ष ठेवले असून दुसऱ्या पिंजऱ्यात कर्मचारी त्या वाघाला बेशुद्ध करण्यासाठी आहेत, असं संजय राठोड यांनी सांगितलं.


वाघाला लांबून डॉट मारता येत नाही. चंद्रपूर जिल्ह्याच्या राजुरा येथील त्या नरभक्षक वाघाला सुरक्षित जेरबंद करण्यासाठी त्याला डॉट मारण्यासाठी वन कर्मचारी त्या दुसऱ्या पिंजऱ्यात आहेत. जेव्हा तो वाघ त्याचं भक्ष खाण्यासाठी येईल, त्यावेळी त्याला बेशुद्ध करण्यासाठी पिंजऱ्यात वन कर्मचारी आहेत. ही त्या मागची भूमिका आहे, असं वनमंत्री संजय राठोड यांनी सांगितले आहे. मानव-वन्यप्राणी संघर्ष कमी करण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. वाघ वाचले पाहिजे, वनांचे संरक्षण झाले पाहिजे, असंही वनमंत्री संजय राठोड यांनी सांगितले.


हल्लेखोर वाघाला पकडण्यासाठी पिंजऱ्यात बसवले कर्मचारी, वनविभागाची शक्कल महागात पडणार?


RT वन या हल्लेखोर वाघाला पकडण्यासाठी वनविभागाने अनोखी शक्कल लावली आहे. वाघावर नजर ठेवण्यासाठी आणि त्याला जेरबंद करण्यासाठी चक्क एका पिंजऱ्यामध्ये वनविभागातील कर्मचाऱ्यांना बसविण्यात आले असून त्यांची संध्याकाळी 6 ते सकाळी 8 अशी ड्युटी लावण्यात आली आहेत.


RT वन या वाघाला जेरबंद करण्यासाठी वनविभागाने एका पुलाखाली अस्थायी पिंजरा तयार केला आहे. राजुरा ते जोगापूर परिसरात असलेल्या एका नाल्यातून हा वाघ अनेक वेळा जातांना दिसला आहे. त्यामुळे या पुलाखालीच एक अस्थायी पिंजरा तयार करून त्यात हा वाघ अडकेल असा वनविभागाचा प्रयत्न आहे. पण हा पिंजरा अस्थायी असल्यामुळे आणि यात ऑटो लिव्हर नसल्यामुळे वाघ आत गेल्यावर पिंजऱ्याचे दार बंद होणार कसं हा प्रश्न वनविभागासमोर उभा झाला आहे.