राजकारणासाठी सर्जिकल स्ट्राईकची अफवा : संजय निरुपम
एबीपी माझा वेब टीम | 04 Oct 2016 01:15 PM (IST)
मुंबई : भारतीय लष्करांनी सर्जिकल स्ट्राईक करुन आठवडा होत नाही, तोवर भारतात राजकारण सुरु झालं आहे. कारण मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष संजय निरुपम यांनी भारताच्या सर्जिकल स्ट्राईकवर शंका उपस्थित केली आहे. संजय निरुपम यांनी ट्विटद्वारे भारताने पाकिस्तानवर सर्जिकल स्ट्राईक करावा, मात्र तो खोटा आणि राजकीय फायद्यासाठी नको, असं म्हटलं आहे. राजकारणासाठी भाजपाने सर्जिकल स्ट्राईकची अफवा पसरवल्याचा आरोप संजय निरुपम यांनी केला आहे. भारताच्या सर्जिकल स्ट्राईकनंतर देशभरात एकीचं वातावरण निर्माण झालं होतं. काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी, उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी पंतप्रधान मोदींचं आणि भारतीय जवानांचं कौतुक केलं होतं. मात्र आता त्यांच्याच पक्षातील नेत्याने म्हणजेच संजय निरुपम यांनी भारताच्या सर्जिकल स्ट्राईकवर शंका उपस्थित केल्याने, पाकिस्तानच्या दाव्याला बळ मिळालं आहे. कारण पाकिस्तान सातत्याने सर्जिकल स्ट्राईक झालाच नाही, असा दावा करत आहे. त्यामुळे भारतातच सर्जिकल स्ट्राईकबद्दल शंका उपस्थित होत असेल तर पाकिस्तानच्या हाती आयतं कोलीत मिळालं आहे. दुसरीकडे दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनीही सर्जिकल स्ट्राईकचे पुरावे द्यावे अशी मागणी केली आहे. त्यामुळे पाकिस्तानी मीडियाने केजरीवाल यांना 'हिरो' केलं आहे. लोकांच्या मनात शंका का निर्माण करता? दरम्यान, देशाच्या सुरक्षेच्या बाबतीत राजकारण आणू नका, लोकांच्या मनात शंका निर्माण का करताय? असा सवाल निवृत्त जनरल शेकटकर यांनी विचारला आहे.