मुंबई : राज्यातील ज्या सहकारी साखर कारखान्यांना थकहमी अर्थात मार्जिन लोन (Margin Money Loan) देण्यात येणार आहे त्यातून काँग्रेसचे आमदार संग्राम थोपटे आणि अहमदनगरचे विवेक कोल्हे यांच्या कारखान्यांना वगळण्यात आलं आहे. हे दोन कारखाने वगळण्यासाठी त्या-त्या जिल्ह्यातील बड्या नेत्यांचा दबाव विभागावर असल्याची सूत्रांनी माहिती दिली.


राज्यातील 11 कारखान्यांना 1590 कोटी 16 लाखांची थकहमी देण्यात येणार आहे. पहिल्या यादित 13 कारखान्यांना 1898 कोटी रुपयांची थकहमी देण्याचा निर्णय घेतला होता. मात्र नव्याने आदेश काढत 11 कारखान्यांना 1590.16 कोटी रुपयांची थकहमी देण्याचा शासन आदेश प्रसिद्ध करण्यात आला. 


या कारखान्यांची निवड करण्यासाठी सहकारमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रिमंडळ उपसमिती नेमण्यात आली आहे. या समितीने याआधी 13 सहकारी साखर कारखान्यांची यादी तयार करून मंजुरी दिली होती. आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आणि लोकसभा निवडणुकीत विरोधात काम करणाऱ्या काँग्रेस आमदार संग्राम थोपटे आणि विवेक कोल्हे यांना राज्य सरकारने कोंडीत पकडत त्यांच्या साखर कारखान्यांना थकहमी नाकारल्याची चर्चा आहे. 


दरम्यान, काँग्रेसच्या संग्राम थोपटे यांच्या कारखान्याला थकहमी देण्याचा निर्णय या आधी घेण्यात आला होता आणि त्यामुळे आश्चर्य व्यक्त केले जात होते. मात्र त्यानंतर मंत्रिमंडळ उपसमितीची बैठक घेऊन या दोन कारखान्यांच्या नावावर फुली मारण्यात आली. हे दोनही कारखाने रद्द करण्यासाठी त्या जिल्ह्यातील बड्या नेत्यांचा दबाव विभागावर असल्याची सूत्रांची माहिती आहे. 


एनसीडीसीने थकहमी दिलेले कारखाने (रक्कम कोटीत)


- लोकनेते सुंदरराव सोळंके सहकारी साखर कारखाना (धारूर, बीड) : 97.76  कोटी 


- श्री संत दामाजी सहकारी साखर कारखाना, मंगळवेढा  : 94 कोटी


- वृधेश्वर सहकारी साखर कारखाना , पाथर्डी : 93  कोटी


- लोकनेते मारुतीराव घुले पाटील सहकारी साखर कारखाना , नेवासा   : 140 कोटी  


- किसनवीर सातारा सहकारी साखर कारखाना,  वाई : 327 कोटी 


- किसनवीर खंडाळा सहकारी साखर कारखाना, खंडाळा : 150 कोटी 


- अगस्ती सहकारी साखर कारखाना, अकोले : 94 कोटी


- श्री तात्यासाहेब कोरे वारणा सहकारी साखर कारखाना, वारणानगर : 327 कोटी 


- श्री विठ्ठलसाई सहकारी साखर कारखाना, उमरगा : 94 


- अंबेजोगाई सहकारी साखर कारखाना, अंबेजोगाई : 80 कोटी 


- सहकार महर्षी शिवाजीराव नागवडे सहकारी साखर कारखाना, श्रीगोंदा : 103.  40 कोटी


ही बातमी वाचा: