सांगली: नोटाबंदीनंतर पंतप्रधान मोदींनी आपल्या 'मन की बात' या कार्यक्रमातून कॅशलेस सोसायटीसाठी जनतेला आवहन केले होते. यानंतर शासकीय पातळीवरुनही प्रयत्न सुरु झाले असताना, यामध्ये सांगलीतील एका पानशॉप मालकाने आपला खारीचा वाटा उचलला आहे. या पानशॉप चालकाने आपले दुकान कॅशलेस केलं आहे.


नोटाबंदीच्या निर्णयानंतर बहुतेक सर्व एटीएममधून 2000 च्या नोटाच मिळत होत्या. त्यामुळे पान खाणाऱ्यांची मोठी पंचाईत झाली होती. कारण, 10, 20 रुपयाच्या पानासाठी 2000 रुपयाची कोणताही पान शॉपवाला सुटे देत नसे. त्यामुळे एकतर उधारीवर पान खा, किंवा सुट्टे पैसे द्या. या परिस्थितीला  प्रत्येक पान शौकीन मागील काही दिवसामध्ये  सामोरे गेला असेल. पण यावर सांगलीतील एका पान शॉप चालकाने मार्ग काढून पानपट्टीवर स्वाईप मशिन उपलब्ध करुन दिले आहे.

सांगली शहरातील कॉलेज कॉर्नर चौकात असलेल्या आर्या पान शॉप मालकाने ग्राहकासाठी हे स्वाइप मशिन बसवून एक सुखद धक्का दिला आहे. विशेष म्हणजे, स्वाइप मशिनद्वारे व्यवहार करणारी राज्यातील हे पहिले पानशॉप असल्याचा दावा या पान शॉपचे मालक विजय पाटील यांनी केला आहे.

या स्वाइप मशिनमुळे येणेबाकी जमा होत असून, व्यवहार संपूर्ण कॅशलेस असल्याने आम्ही सुरक्षित आहोत, असे मत त्यांनी व्यक्त केलं आहे. ज्याच्याकडे 100, 50 रुपयाच्या नोटा आहेत ते रोख रक्कम देत पान घेतात. त्यामुळे सध्या हे पान शॉप पुर्णत:  कॅशलेस नसले तरी लवकरच ते होईल असा विश्वास पाटील यांनी व्यक्त केला आहे.