बनावट टोळीच्या अटकेचा संपूर्ण घटनाक्रम
राज राजकुमार उज्जेनवाल सिंह (28), प्रेमविष्णू रोगा राफा (26), नरेंद्र आशापाल ठाकूर (33, कल्याण) हे तिघे 23 ऑगस्ट रोजी सांगलीत मुख्य बसस्थानकाजवळील एका दुकानातून खाद्यपदार्थ खरेदी करत असताना त्यांनी दुकान मालकाला दोन हजाराची नोट दिली. दुकानात असलेल्या महिलेला नोटेविषयी शंका आल्याने तिने संशयितांना, नोट बनावट आहे की काय? असा प्रश्न उपस्थित केला. त्यावेळी हा प्रकार उघडकीस आला होता. त्यादिवशी राज सिंह यास पकडले होते. त्याचे साथीदार पळून गेले होते. त्यांना गेल्या आठवड्यात पकडले होते.
याप्रकरणी नवी मुंबईतून आणखी दोघांना अटक करण्यात आली आहे. त्यांच्याकडूनही दोन हजाराच्या 92 नोटा जप्त केल्या आहेत. अटकेतील संशयितांची संख्या आता पाच झाली आहे. तसेच 113 बनावट नोटा जप्त केल्या आहेत.
सुरज उर्फ मनिष मल्ला ठाकुरी (वय 36, रा. अर्जुनवाडी, घणसोली, नवी मुंबई) व जिलानी आश्पाक शेख (47, शिव कॉलनी, गजानन मंदिरजवळ, एरोल सेक्ट 1, नवी मुंबई) अशी नव्याने अटक केलेल्या दोघांची नावे आहेत.
अटकेतील राज सिंह, प्रेमविष्णू राफा व नरेंद्र ठाकूर या तिघांची कसून चौकशी करण्यात आली. चौकशीतून जिलानी शेख व सूरज ठाकूरी यांची नावे निष्पन्न झाली. त्यांच्या शोधासाठी शहर पोलिसांचे पथक शुक्रवारी सकाळी नवी मुंबईला रवाना झाले होते. तेथून पथकाने या दोघांना पकडले. दोघांच्या घराची झडती घेतल्यानंतर दोन हजाराच्या आणखी 92 बनावट नोटा सापडल्या. त्या जप्त करुन पथक शनिवारी पहाटे सांगलीत दाखल झाले. यातील जिलानी शेख हा टोळीचा म्होरक्या आहेत. त्याच्या चौकशीतूून बनावट नोटांचे मुख्य केंद्र पश्चिम बंगाल असल्याचे स्पष्ट झाले आहेत. तेथील दोघांची नावे पुढे आली आहेत. त्यांना ताब्यात घेण्यासाठी शहर पोलिसांचे पथक येत्या एक-दोन दिवसात पश्चिम बंगालला रवाना होणार आहे.
जिलानी शेख याचे मूळ हे पश्चिम बंगालमधील मालदा हे गाव असून नवी मुंबईत त्याचे चिकन विक्रीचे दुकान आहे. पश्चिम बंगालला तो अधून-मधून जातो. तिथे तो बनावट नोटांची छपाई करणाऱ्या टोळीच्या संपर्कात आला. त्यानंतर त्याने हा व्यवसाय सुरु केला.बंगालच्या या टोळीचे बँकेत खाते आहे. या खात्यावर दहा हजार रुपये भरल्यानंतर ही टोळी त्या बदल्यात दोन हजाराच्या बनावट 50 नोटा (एक लाख रुपये) देते. या नोटा घेऊन एकजण रेल्वेने कल्याणमध्ये येतो. त्याच्याकडून शेख नोटा घेऊन त्या साथीदारांच्या माध्यमातून चलनात आणत होता. टोळीच्या खात्यावर आतापर्यंत त्याने 12 लाख रुपये भरले आहेत. यावरुन त्यान या बदल्यात एक कोटी 20 लाख रुपये (बनावट नोटा) घेतल्याचे स्पष्ट झाले आहे.
अटकेतील संशयितांचे पाचही मोबाईल जप्त केले आहेत. याशिवाय प्रेमविष्णू राफा याची स्वत:च्या नावावरील तीन बनावट आधार कार्ड, तीन बनावट पॅनकार्ड, विविध बँकाची पाच एकटी जप्त केले आहेत. या सर्वांचे कोणत्या-कोणत्या बँकेत खाते आहे, याची माहिती काढण्याचे काम सुरु आहे. बँक व्यवहारावरुन पश्चिम बंगालच्या टोळीतील काही जणांचे नाव पुढे येण्याची शक्यता आहे.
बनावट नोटा चलनात आणल्याप्रकरणी जिलानी शेख याच्याविरुद्ध नाशिक जिल्ह्यातील सिन्नर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आहे. या गुन्ह्यात त्याला दोन वर्षापूर्वी अटकही झाली होती. जामिनावर बाहेर आल्यानंतर त्याने पुन्हा बनावट नोटांचा हा व्यवसाय सुरु केला. आता तो सांगली पोलिसांच्या हाती लागला आहे.
एका बनावट नोटेमागे 3 रुपये कमिशन
जिलानी शेख याच्याकडे प्रेमविष्णू राफा हा प्रथम कामाला होता. दोन हजाराची एक नोटा बाजारात चलनात आणली की शेख त्याला तीन रुपये कमिशन देत असे. चलनात सहजपणे नोट खपू लागल्याने राफाने जिलानीकडून टोळीचा पत्ता घेऊन स्वतंत्र व्यवसाय सुरु केला. दोघांनीही नोटा खपविण्यासाठी कमिशनवर एजंटांची नियुक्त केली. हे एजंटही त्याने परिस्थितीने गरीब असलेले निवडले.
गेल्या दीन वर्षात टोळीने राज्यातील सर्व जिल्ह्यात प्रवास करुन सुमारे पाच कोटी रुपयांची रक्कम चलनात आणल्या आहेत. या सर्व दोन हजाराच्या बनावट नोटा आहेत. इंटरनेटवरुन ते प्रत्येक जिल्ह्याची माहिती घेत असे. त्यानंतर ते प्रवासाला निघत असे. सांगलीचीही त्यांनी इंटरनेटवरुन माहिती घेतली. त्यानंतर राफासह चौघे रेल्वेने मिरजेत आले. तेथून ते सांगलीत आले होते.
बातमीचा व्हिडीओ :