सांगली : इस्लामपूर शहरात वाढवणाऱ्या गुंडगिरीला पोलिसांकडून चांगलाच धडा शिकवला. भरदिवसा धारदार शस्त्र दाखवत संपूर्ण शहरात दहशत माजवणाऱ्या गुंडांची  इस्लामपूर पोलिसांनी शहरातील प्रमुख मार्गावरून धिंड काढली. व्यापाऱ्यांना खंडणी मागणाऱ्या टोळक्याची पोलिसांनी दहशत मोडीत काढली आहे.


इस्लामपूरमध्ये दहशत पसरवणाऱ्या 8 जणांना पोलिसांनी केली अटक आहे. दहशत माजवणारे टोळके हे नशा करून गुन्हे करत असल्याचे समोर आले होते. इस्लामपूर शहरातील सर्वच मेडिकल दुकानदारांनी नशेच्या गोळ्या ठेवू नये असे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले आहे.

सांगली जिल्ह्यातील इस्लामपूर शहरात काही दिवसांपासून गुंडांनी हैदोस घातला होता. भरदिवसा धारदार शस्त्र दाखवत संपूर्ण शहरातून दहशत माजवत व्यापाऱ्यांना खंडणी मागणे असे अनेक प्रकार सर्रासपणे घडत होते. या गुंडगिरीने पोलीस प्रशासनासमोर आव्हान उभे राहले होते.

शहरातील व्यापाऱ्यांनी अनेकदा तक्रारीही केल्या होत्या. या तक्रारीवरून चार दिवसांपासून पोलिसांनी राजकीय वरदहस्त डावलून गुंडांची पाळेमुळे खणण्यास सुरुवात केली आणि दहशत माजवणाऱ्या गुंडांना पकडून शहरातून धिंड काढत दहशत मोडीत काढली.

खंडणीची मागणी करत व्यावसायिक जितेंद्र परदेशी यांच्यावर खूनी हल्ला प्रकरणी गुंड सोनम शिंदे, मुज्जमिल शेख, नितीन पालकर व जयेश माने या चौघांच्या पोलीस कोठडीत एक दिवसाची वाढ करण्यात आली आहे. या सर्व आरोपींना काल  घटनास्थळावर नेताना इस्लामपूर पोलिसांनी शहरातील प्रमुख मार्गावरून धिंड काढली. आरोपींची धिंड पाहण्यासाठी इस्लामपूर शहरातील हजारो नागरिक जमा झाले होते. शहरातील गुंडगिरीला आळा घालण्यासाठी पोलिसांनी उचललेल्या या पावलाचे सामान्य नागरिकांमधून स्वागत  होत आहे. इस्लामपूरचे पोलीस निरीक्षक विश्वास साळोखे यांच्या नेतृत्वात ही कारवाई करण्यात आली.