सांगली :  सांगली जिल्ह्यातील पलूस तालुक्यातील दुधोंडी याठिकाणी काल सायंकाळी तिहेरी हत्याकांडाची घटना घडली.  वसंतनगर भागात पूर्ववैमनस्यातून हा हल्ला झाल्याचे समोर आले आहे. वादाचे पर्यवसान हाणामारीत झाले ज्यात 3 जणांची हत्या तर चार जण जखमी झाले आहेत त्यात 3 गंभीर जखमी झाले आहेत. पूर्ववैमनस्यातून हा वाद झाल्याची माहिती असून तलवारीने दोन गटात झालेल्या तुफान राड्यात तिघांची हत्या झालीय. या तिहेरी हत्येच्या घटनेमुळे जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. 


पोलिसांनी सुरुवातीला अण्णा भाऊ साठे यांच्या जयंती कार्यक्रम साजरा करण्याच्या वादावरून वाद झाला आणि यातून पुढे हल्ला अशी माहिती प्राथमिक माहिती दिली होती. पण पूर्ववैमनस्यातून हा हल्ला झाल्याचे समोर आलंय.


माहितीनुसार गावातील मोहिते आणि साठे गटांमध्ये हा राडा झाला आहे. गेल्या काही महिन्यांपासून या दोन्ही गटांमध्ये पूर्ववैमनस्यातून वादावादीचे प्रकार घडले होते. शनिवारी देखील या दोन्ही गटांमध्ये वादावादीचा प्रकार घडला होता. त्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी येऊन दोन्ही गटांना समजण्याचा प्रयत्न केला होता. मात्र रविवारी दुपारी हा वाद आणखी उफाळून आला.


यातून मोहिते आणि साठे गटामध्ये जोरदार हाणामारीचा प्रकार घडला. ज्यामध्ये तलवार व धारदार शस्त्रांनी झालेल्या हल्ल्यामध्ये तीन जणांची हत्या झाली आहे. यामध्ये अरविंद साठे,विकास मोहिते,सनी मोहिते या तिघांचा मृत्यू झाला आहे.तर आकाश मोहिते, स्वप्नील साठे, दिलीप साठे आणि संग्राम मोहिते हे जखमी असून त्यांच्यावर सांगलीच्या शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत. दरम्यान या घटनेनंतर दुधोंडी गावामध्ये तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. गावात  पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आलाय. पण या तिहेरी खुनाच्या घटनेने सांगली जिल्हा हादरून गेला आहे.