Unseasonal Rain News : राज्यात सध्या बहुतांश भागात उन्हाचा चटका जाणवत आहे. तर दुसरीकडे काही ठिकाणी अवकाळी पावसानं हजेरी लावलीय. हिंगोली जिल्ह्यात रात्री वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस झाला. अचानक आलेल्या पावसामुळे नागरिकांची चांगलीच तारंबळ उडाल्याचे पाहायला मिळाले. तर ग्रामीण भागात काही ठिकाणी गारांचा पाऊस देखील झाला आहे. या अवकाळी पावसामुळे हळद पिकासह फळबागांचे मोठं नुकसान झालं आहे.
रात्री हिंगोली जिल्ह्यांमध्ये वादळी वाऱ्यासह पाऊस झाला आहे. तर ग्रामीण भागात काही ठिकाणी गारांचा पाऊस देखील झाला आहे. अचानक आलेल्या वादळी वाऱ्यासह गारांच्या पावसामुळे नागरिकांची तारंबळ उडाली. उकाड्यापासून त्रस्त असलेल्या सर्व जिल्हावासीयांना या पावसामुळे तात्पुरता दिलासा मिळाला असला तरी या वादळी वाऱ्यामुळे अनेक ठिकाणी विजेचे खांब पडले आहेत. त्याचबरोबर शेतातील पॉलिश करत असलेली हळद भिजली आहे. शेतात उभ्या असलेल्या केळीच्या, डाळिंबाच्या आणि आंबा बागांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.
हवामान विभागाने वर्तविला अंदाजानुसार बुधुवारी दुपारीच हिंगोली शहरासह वसमत औंढा कळमनुरी या तालुक्यांच्या ग्रामीण भागातसुद्धा वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस आणि गारपीट झाली. वाढत्या तापमानामुळे जिल्ह्यात काल झालेल्या पावसामुळे तात्पुरते समाधान झाले असले तरी मात्र शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. अनेक ठिकाणी शेतामध्ये विक्रीसाठी तयार झाल्या हळदीला पॉलिश करण्याचे काम सुरु होते. अशातच हा पाऊस आल्याने मोठ्या प्रमाणात शेतातील हळद भिजली आहे.
वादळी वारे आणि गारपीट मोठ्या प्रमाणात असल्याने याचा फटका फळबागांना सुद्धा बसला आहे. आंब्याचे मोठ्या प्रमाणावर नुकसान आहे. झाडाला तयार असलेले फळ या वादळी वाऱ्यामुळे तुटून पडले आहे. त्यामुळे आता या तुटून पडलेल्या फळांना कवडीमोल दराने कोणी खरेदी करायला तयार होत नाही. तर दुसरीकडे डाळिंब, संत्री, मोसंबी यांच्या अनेक बागा वादळी वाऱ्यामुळे नष्ट झाल्याची माहिती आहे. या फळांची झाडे मोडून पडली आहेत तर अनेक ठिकाणी केळीचेसुद्धा मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याची प्राथमिक माहिती आहे.
दरम्यान, प्रशासनाने तत्काळ या संपूर्ण नुकसानीचे पंचनामे करावे आणि शेतकऱ्यांना मदत जाहीर करावी अशी मागणी केली जात आहे. फळबागांचे होणारे नुकसान हे आर्थिकदृष्ट्या मोठ्या प्रमाणात असते. त्यामुळे नुकसानीचे गांभीर्य लक्षात घेत प्रशासनाने पंचनामे करावी आशि मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.