Corona Third Wave :  कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचे गंभीर परिणाम राज्यात दिसून येत आहेत. रुग्णसंख्येमध्ये सातत्याने मोठी वाढ होत आहे आणि दुसरीकडे आरोग्य यंत्रणा या परिस्थितीत अतोनात प्रयत्न करुनही अपुरी पडताना दिसत आहे. त्यामुळं रुग्णांचा मृत्यू आलेख देखील वाढला आहे. या पार्श्वभूमीवर कोरोनाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेच्या अनुषंगाने सांगली महापालिका प्रशासन आताच सतर्क झाले असून तिसऱ्या लाटेशी सामना करण्याची तयारीही सुरु केली आहे. 

कोरोनाच्या तिसऱ्या लाटेमध्ये लहान मुलांमध्ये हा प्रादुर्भाव होण्याची जास्त शक्यता लक्षात घेत याबतचा ऍक्शन प्लॅन तयार करण्यात आला आहे. मनपा आयुक्त नितीन कापडणीस यांनी नुकतीच सांगली मधील बालरोगतज्ज्ञांची बैठक घेतली या बैठकीत लहान मुलाच्या अनुषंगाने मनपा क्षेत्रात टास्क फोर्स, हेल्पलाईन आणि चाईल्ड केअर सेंटर सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. 

कोरोनाची तिसरी लाट आलीच तर महापालिका प्रशासन सर्व तयारीनिशी सज्ज असेल,  असा विश्वास मनपा आयुक्त नितीन कापडणीस यांनी व्यक्त केला.  सांगली मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिका पालिका क्षेत्रात कोरोनाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर महापालिका आयुक्त नितीन कापडणीस यांनी आयुक्त कार्यालयात मनपाक्षेत्रातील बालरोगतज्ज्ञाची बैठक आयोजित केली होती. 

पालिकेच्या या बैठकीत डॉ. शरद घाडगे, डॉ. सतीश अष्टेकर, हर्षल वाघ, पंकज कुपवाडे, डॉ. जी ए श्रीनिवास , डॉ. सुधीर मगदूम, डॉ. उज्वला गवळी, डॉ. वसुधा जोशी, डॉ. सुहास भावे , डॉ. विठ्ठल माळी , डॉ. अमीत तगारे हे बालरोगतज्ज्ञ उपस्थित होते. या बैठकीत कोरोनाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेबाबत चर्चा झाली. तसेच या तिसऱ्या लाटेत कशा पद्धतीने बालकांना याचा त्रास होऊ शकतो. यावर काळजी कशी घ्यावी, उपचाराच्या पद्धती कशा असतील याबाबत सविस्तर चर्चा झाली. 

Co-WIN App : भारत सरकारने लसीकरण अ‍ॅपचे संपूर्ण विकेंद्रीकरण करावे, जयंत पाटलांची मागणी

तिसऱ्या लाटेला तोंड देण्यासाठी मनपा क्षेत्रात टास्क फोर्स स्थापन करण्याचा निर्णयही घेण्यात आला. तसेच कोरोनाबधित बालकांच्या पालकांसाठी  हेल्पलाईन सुरू करण्याचा आणि परिस्थिती आलीच तर चाईल्ड कोविड केअर सेंटर सुरू करण्याचा निर्णयही या बैठकीत घेण्यात आला. मनपा क्षेत्रात कोरोनाची तिसरी लाट आलीच तर त्यादृष्टीने  लहान मुलांच्या साठी हॉस्पिटल पासुन सर्व गोष्टींची  तयारी असली पाहिजे यावर बैठकीत चर्चा झालीय.  या परिस्थितीचा सामना करण्यासाठी सर्व बालरोगतज्ज्ञ यांनी मनपाला सहकार्य करावे, असे आवाहनही आयुक्तांनी केलंय. जर कोरोनाच्या तिसऱ्या लाटेची परिस्थिती आलीच तर महापालिका प्रशासन सर्व तयारीनिशी सज्ज असेल असा विश्वासही मनपा आयुक्त नितीन कापडणीस यांनी यावेळी बोलताना व्यक्त केला.