सांगली : सांगली महापालिका निवडणुकीसाठी गेल्या महिन्यापासून धडधडत असलेल्या राजकीय तोफा सोमवारी सायंकाळी पाच वाजता थंड झाल्या. गेल्या काही दिवसांपासून सांगली, मिरज आणि कुपवाड या शहरांत निवडणुकीचा ज्वर वाढला होता.
महापालिकेची ही पाचवी सार्वत्रिक निवडणूक असून एक ऑगस्ट रोजी मतदान होत आहे. सांगलीसोबतच जळगाव महापालिकेसाठीही एक ऑगस्टलाच मतदान होत आहे. एकूण 20 प्रभागांतील 78 जागांसाठी 541 उमेदवार रिंगणात आहेत. यंदा 18 प्रभागातून प्रत्येकी चार, तर दोन प्रभागांतून प्रत्येकी तीन सदस्य निवडून दिले जाणार आहेत.
सर्वच राजकीय पक्षांनी आज शक्ती प्रदर्शन करत शहरातून पदयात्रा रॅली काढली. गेल्या अनेक वर्षांपासून महापालिकेत सत्तेत असलेल्या काँग्रेसने यंदा राष्ट्रवादीसोबत आघाडी केली आहे. भाजपला महापालिकेत सत्तेत येऊ न देणे हा या आघाडीने चंग बांधलाय.
भाजपने पोलीस बळाचा वापर केला : जयंत पाटील
काँग्रेस-राष्ट्रवादीच्या आघाडीला पुन्हा एकदा महापालिकेत निर्विवाद सत्ता मिळेल, असा विश्वास काँगेस-राष्ट्रवादीच्या नेत्यांनी व्यक्त केलाय. यावेळी राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी निवडणुकीत भाजपच्या पायाखालची वाळू घसरू लागल्याने त्यांनी पोलिसांच्या बळाचा वापर करून आघाडीच्या उमेदवारांना धमकावत असल्याचा आरोप केला. याशिवाय ईव्हीएम यंत्राची तपासणी करावी, यंत्र नीट काम करतात का नाही याची तपासणी पारदर्शी करावी, अशा सूचना निवडणूक अधिकाऱ्यांना केल्या असल्याचं ते म्हणाले.
भाजपचा निर्विवाद विजयाचा दावा
पहिल्यांदाच मोठ्या ताकदीने सांगली महापालिका निवडणूक लढवणाऱ्या भाजपने या निवडणुकीच्या निमित्ताने काँग्रेस-राष्ट्रवादीवर टीका केली. सांगलीकर जनता ही काँग्रेसला कंटाळली आहे. अनेक वर्षे काँग्रेसने सत्ता भोगली, मात्र म्हणावा तसा विकास या शहराचा झाला नाही. त्यामुळे भाजपला स्पष्ट बहुमत मिळेल आणि भाजपची सत्ता सांगली महापालिकेवर येईल आणि महापौर भाजपचाच होईल, असं दावा पालकमंत्री सुभाष देशमुख यांनी छातीठोकपणे केला.
भाजपप्रमाणे शिवसेनाही ही निवडणूक पहिल्यांदाच मोठ्या ताकदीने लढवत आहे. शिवसेना निवडणुकीत स्वतंत्रपणे उतरली आहे. ही निवडणूक त्रिशंकू होण्याची शक्यता आहे. मात्र अचंबित करणारा निकाल हाती येईल आणि शिवसेना सत्ता काबीज करेल, असा आशावाद शिवसेनेचे खासदार गजानन कीर्तिकर यांनी व्यक्त केला.
महापालिकेची ही निवडणूक आगामी लोकसभा, विधानसभेची तालीम असल्याने सर्वच पक्ष महापालिकेवर आपला झेंडा फडकवण्यासाठी प्रयत्न करत आहेत. एकीकडे काँग्रेस-राष्ट्रवादीच्या वर्षानुवर्षे ताब्यात असेलेली महापालिका भाजपला आपल्या ताब्यात घ्यायचीय, तर दुसरीकडे जिल्हा परिषदेनंतर पहिल्यांदाच ताब्यात घेतल्यानंतर भाजपची नजर आता महापालिकेवर आहे.
78 जागांसाठी 451 उमेदवार रिंगणात
काँग्रेस – 44, राष्ट्रवादी - 34
भाजप - 78
शिवसेना - 56
अपक्ष विकास महाआघाडी - 43
स्वाभिमानी विकास आघाडी - 20
सांगली जिल्हा सुधार समिती - 21
एमआयएम - 8
सांगली महापालिका निवडणुकीच्या प्रचारतोफा थंडावल्या
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
30 Jul 2018 08:18 PM (IST)
गेल्या काही दिवसांपासून सांगली, मिरज आणि कुपवाड या शहरांत निवडणुकीचा ज्वर वाढला होता. महापालिकेची ही पाचवी सार्वत्रिक निवडणूक असून एक ऑगस्ट रोजी मतदान होत आहे.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -