सांगली : सांगली महापालिकेने मनपा क्षेत्रात कोरोनाची वाढती संख्या लक्षात घेऊन अवघ्या सात दिवसात ऑक्सिजनयुक्त 120 बेडचे कोविड हॉस्पिटल उभारले आहे. दिवसरात्र मेहनत करीत अवघ्या सात दिवसात मनपा कर्मचाऱ्यानी हे 120 बेडचे कोविड हेल्थ सेंटर उभारले आहे. मनपा आयुक्त नितीन कापडणीस यांनी कोविड रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेत मनपाचे कोव्हिड हॉस्पिटल उभारण्याचा निर्णय घेतला. सांगली - कोल्हापूर रोडवरील आदीसागर सांस्कृतिक भवनमध्ये 13 ऑगस्ट रोजी 120 बेडचे कोव्हिड हॉस्पिटल उभारण्याचे काम सुरू केले. अवघ्या सात दिवसात 120 बेडचे कोविड हॉस्पिटल तयार झाले आहे.


या कोविड सेंटरमध्ये 100 ऑक्सिजनयुक्त बेडची व्यवस्था असून 20 बेड हे कोविड संशयित रुग्णांसाठी ठेवण्यात आले आहेत. या कोविड रुग्णालयात कर्मचाऱ्यांची 6 तासांची ड्युटी असणार आहे. तर 14 फिजिशियन, 7 मनोविकार तज्ञ, 24 निवासी वैद्यकीय अधिकारी तसेच एका शिफ्टला 22 जीएमएम वार्ड बॉय, लॅब एक्सरे टेक्निशियन, 6 स्वच्छता कर्मचारी आणि एक एसआय यांसह 24 तास ऑक्सिजनयुक्त रुग्णवाहिका सज्ज असणार आहे.

या रुग्णालयातील कोविड रुग्णांची शासनाच्या सर्व पोर्टलवर नोंद राहणार असून शहरातील रुग्णांसाठीच हे रुग्णालय असणार आहे. या रुग्णालयासाठी आठ लाखाची रक्कम विविध संस्था संघटनांनी दिलेल्या मदतीतून जमा झाली आहे. तर 15 लाखाचे साहित्यही लोकांनी भेट स्वरूपात दिले आहे. जीवन ज्योतकडून 10 बेड देण्यात आले असून महापालिकेचे नगरसेवकसुद्धा मानधन देण्याच्या विचारात आहेत.

याचबरोबर महापालिकेचे अधिकारी कर्मचारी आणि शिक्षक एक दिवसाचा पगार देणार कोविड हॉस्पिटलसाठी देणार असून यातून 18 लाखांची रक्कम जमा होणार आहेत. सात दिवसात पूर्ण झालेल्या या कोविड हॉस्पिटलमध्ये रुग्णांवर मोफत उपचार केले जाणार असून कोणतेही शुल्क आकारले जाणार नाही. या कोविड हॉस्पिटलमध्ये ऑक्सिजन बेडची सुविधा असून येणाऱ्या रुग्णांना उपचारासह सर्व सेवा मोफत दिल्या जाणार आहेत.

या ठिकाणी उपचार घेणाऱ्या कोविड रुग्णांना त्यांच्या नातेवाईकांशी संपर्क साधण्यासाठी याठिकाणी व्हिडीओ कॉलिंगची सुविधा सुद्धा बसवण्यात आली आहे. याचबरोबर तज्ञ वैद्यकीय स्टाफ सुद्धा तैनात करण्यात आला आहे. पालकमंत्री जयंत पाटील आणि राज्यमंत्री विश्वजित कदम यांनी व्हिडीओ कॉलिंगद्वारे मुंबईतून महापालिकेचे हॉस्पिटल पाहत मनपा आयुक्त नितीन कापडणीस आणि प्रशासनाचे कौतुक केले.