सांगली : राज्याचे जलसंपदामंत्री गिरीश महाजन आणि जिल्ह्याचे पालकमंत्री सुभाष देशमुख यांना सांगलीतील पूरग्रस्तांच्या रोषाला सामोरं जावं लागलं. पूरग्रस्त भागाची पाहणी करण्यासाठी गेले असताना दोन्ही मंत्र्यांना स्थानिकांनी घेरलं. तुम्ही चार दिवस कुठे होता? प्रशासनाने मदत पोहोचवण्यास उशीर का केला, असा सवाल त्यांनी विचारला.

मागील काही दिवसांपासून सुरु असलेल्या पावसामुळे सांगली आणि कोल्हापुरात महापूर आला. परिणामी हजारो लोक अनेक दिवसांपासून पुराच्या पाण्यात अडकले आहेत. परंतु अद्याप या लोकांपर्यंत मदत पोहोचवण्यात प्रशासनाने दिरंगाई केली. तसंच बचावकार्यासाठी बोटींची संख्याही कमी असल्याने हजारो लोक पुराच्या पाण्यात अडकून आहेत, असा आरोप करत स्थानिकांनी त्यांना घेरलं.

"तुम्ही यात्रा काढत आहात, तुमची यंत्रणा चुकीची आहे, आम्हाला यांची मदत नको, आम्ही सक्षम आहोत," अशी उद्विग्न प्रतिक्रियाही ग्रामस्थांनी दिली आहे.

सेल्फी व्हिडीओमध्ये गिरीश महाजन यांची हसून दाद
दरम्यान, जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी काल (8 ऑगस्ट) कोल्हापूरमधील पूरपरिस्थितीचा बोटीतून आढावा घेतला. परंतु यावेळी कार्यकर्त्याने काढलेल्या सेल्फी व्हिडीओला गिरीश महाजन यांनी हसून दाद देताना दिसत आहे. त्यामुळे हजारो-लाखो लोक पुरात अडकले असताना मंत्री आनंदात आहेत का असा प्रश्न उपस्थित होत आहे.



दोन दिवस क्षेत्र बुडालं असेल तरच मदत : सरकारचा जीआर


हजारो लोक पुराच्या विळख्यात असताना सरकारने पूरग्रस्तांसाठी मदतीचा हात दिला खरा, परंतु हा हात तोकडा पडत असल्याचं दिसत आहे. कारण या मदतीद्वारे सरकारने पूरग्रस्तांची एकप्रकारे थट्टाच केली आहे. दोन दिवसांपेक्षा जास्त दिवस क्षेत्र पाण्यात बुडालं असेल तरच मोफत अन्नधान्य (10 किलो गहू आणि 10 किलो तांदूळ) देणार, असा जीआर सरकारच्या अन्न आणि नागरी पुरवठा विभागाने 7 ऑगस्ट रोजी जारी केला आहे. एकीकडे लोक पाण्यात असताना, अडचणीत असताना या अटी आणि शर्तींमुळे सरकार राज्यातील पूरग्रस्तांची थट्टा करण्यात धन्यता मानत आहे.