सांगली : मागील चार वर्षापासून राज्य शासनाने सुरु केलेल्या महत्त्वाकांक्षी जलयुक्त शिवार योजनेत 2018-19 मध्ये सांगली जिल्ह्याने राज्यात प्रथम क्रमांक पटकावला आहे. या योजनेत दुसऱ्या स्थानी सातारा तर तिसर्या स्थानी सिंधुदुर्ग जिल्हा आहे. विशेष म्हणजे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा नागपूर जिल्हा रेड झोनमध्ये असून इथे जलयुक्त शिवार योजनेतून केवळ चार टक्के काम झालं आहे.
शाश्वत पाणीसाठे निर्माण करुन टंचाईवर कायमस्वरुपी उपाययोजना करण्याच्या दृष्टीने, गेल्या चार वर्षापासून सुरु करण्यात आलेली जलयुक्त शिवार योजना ही महाराष्ट्र सरकारची महत्वाकांशी योजना मानली जात आहे. 2018-19 या आर्थिक वर्षात सांगली जिल्ह्यातील 103 गावात हे अभियान राबवण्यात येत आहे.
सांगली जिल्ह्यात या वर्षी प्रस्तावित आराखड्यानुसार 2700 कामे आहेत. त्यासाठी 35 कोटी रुपये निधीची तरतूद करण्यात आली आहे. या सर्व 2700 कामांना प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे. या वर्षात आतापर्यंत एक हजार 562 कामे पूर्ण झाली असून, 722 कामे प्रगतीपथावर आहेत. प्रगतीपथावरील कामे आणि पूर्ण झालेल्या कामांची टक्केवारी 85 टक्के आहे. उर्वरित 15 टक्के कामांमध्ये अनेक ठिकाणी सध्या पाणी असल्याने कामे करण्यात अडचण येत आहे. तरीदेखील ही कामे विहीत मुदतीत पूर्ण केली जातील.
जलयुक्त शिवार अभियान ही योजना तर शासनाची प्राधान्यक्रमाची आणि महत्त्वाकांक्षी योजना आहे. सांगली जिल्ह्यात मागील चार वर्षांमध्ये जलयुक्त शिवार अभियानातून अनेक कामे झाली आहेत. त्याचे चांगले परिणाम जिल्ह्यात दिसत आहेत. दोन दिवसांपूर्वी झालेल्या अवकाळी पावसामुळे यातील बऱ्याचशा कामांमध्ये पाणीसाठा झालेला आहे. या पाण्याचा फायदा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सोडवण्यासाठी नक्की होईल, असा विश्वास जिल्हाधिकारी विजयकुमार काळम पाटील यांनी व्यक्त केला आहे.
जलयुक्त शिवार योजनेत सांगली जिल्हा प्रथम, तर नागपूर रेड झोनमध्ये!
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
22 Nov 2018 10:58 AM (IST)
शाश्वत पाणीसाठे निर्माण करुन टंचाईवर कायमस्वरुपी उपाययोजना करण्याच्या दृष्टीने, गेल्या चार वर्षापासून सुरु करण्यात आलेली जलयुक्त शिवार योजना ही महाराष्ट्र सरकारची महत्वाकांशी योजना मानली जात आहे.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -