मुलाचं वय 23, मुलीचं 19, दोघांची विष पिऊन आत्महत्या
एबीपी माझा वेब टीम | 26 Mar 2018 08:06 AM (IST)
तासगाव तालुक्यातील कचरेवाडी- पेड रस्त्यावरील बाटे मळ्यात प्रेमी युगुलाने आत्महत्या केली.
सांगली: तासगाव तालुक्यात प्रेमी युगुलाने विष प्राशन करुन आत्महत्या केल्याचा प्रकार रविवारी रात्री उघडकीस आला. तासगाव तालुक्यातील कचरेवाडी- पेड रस्त्यावरील बाटे मळ्यात प्रेमी युगुलाने आत्महत्या केली. हे दोघेही तासगाव तालुक्यातीलच आहेत. आत्महत्या केलेल्या मुलाचं वय 23 तर मुलीचं वय 19 वर्ष आहे. या घटनेची माहिती मिळताच तासगावचे पोलिस उपाधीक्षक अशोक बनकर पथकासह तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. त्यांना दोन्ही मृतदेह ठराविक अंतरावर पडल्याचं दिसलं. दोन्ही मृतदेहातून दुर्गंधी येत होती. मृतदेहाशेजारी विषाची बाटली सापडली असल्याचे पोलिसांनी सांगितलं. मृत तरुण शुक्रवारपासून घरातून बेपत्ता होता. याबाबत त्याच्या आई-वडिलांनी तासगाव पोलिसांत बेपत्ता झाल्याची फिर्याददेखील दाखल केली होती. नेमके याचवेळी बोरगाव येथून तरुणीही पाहुण्यांकडे जाते असे सांगून घराबाहेर पडली. मात्र ती पाहुण्यांच्या घरात पोहचली नाही. त्यामुळे तिच्याही आई वडीलांनी सर्व पाहुण्यांकडे शोधाशोध सुरु केली होती. पण रविवारी या दोघांनीही विषारी औषध प्राषण करुन आत्महत्या केल्याचे निष्पन्न झाले. याबाबत पोलीस अधिक तपास करत आहेत. मुलगा घरातून जाताना जी मोटारसायकल घेऊन घराबाहेर पडला, ती मोटारसायकलदेखील पोलिसांनी घटनास्थळावरून ताब्यात घेतली आहे. मुलाचं गाव निंबळक आहे, तेच गाव मुलीच्या मामाचं आहे. मामाच्या गावी जाणं येणं होत असल्याने, दोघांची ओळख आणि पुढे प्रेमप्रकरण सुरु होतं, अशी चर्चा परिसरात आहे.